उल्हासनगरात ५ महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी दोन महिलांना अटक
By सदानंद नाईक | Updated: May 12, 2024 17:06 IST2024-05-12T17:06:04+5:302024-05-12T17:06:25+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-२, झुलेलाल मंदिरा समोर मीना सोनावणे नावाची महिला भिक्षा मागण्याचे काम करीत असून ती म्हारळगाव येथील झोपडपट्टी परिसरात कुटुंबासह राहते.

उल्हासनगरात ५ महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी दोन महिलांना अटक
उल्हासनगर : शहरातील ५ महिन्याच्या मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी बिहार बागलपूर येथून दोन महिलांना अटक केली. न्यायालयाने १७ मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-२, झुलेलाल मंदिरा समोर मीना सोनावणे नावाची महिला भिक्षा मागण्याचे काम करीत असून ती म्हारळगाव येथील झोपडपट्टी परिसरात कुटुंबासह राहते. तीला चैतन्य, कृष्णा, साहिल, लक्ष्मी व ५ महिन्याचा कार्तिक असे पाच मुले आहेत. कार्तिक याची तब्येत बरोबर राहत नसल्याने, त्याच्या उपचारासाठी मीना हिने सोशल मीडियावर कार्तिकचा फोटो व मध्यवर्ती रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड व्हायरल करून मदतीचे आवाहन केले होते. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई बोरिवलीवरून स्वाती बेहरा या महिलेने प्रतिसाद देऊन कार्तिकच्या उपचाराचे आमिष दाखविले. १२ फेब्रुवारी रोजी मीना सोनावणे, पती सुनील सोनावणे, ५ महिन्यांचा कार्तिक यांना बोरिवली येथे स्वाती बोहरा यांनी बोलावून हैद्राबाद येथे नेले. हैद्राबाद येथे गेल्यावर स्वाती बोहरा या महिलेने एका अनोळखो महिले सोबत ओळख करून दिली. त्यावेळी कार्तिकच्या उपचारासाठी २ लाख रुपये डॉक्टराला डिपॉझिट म्हणून दिल्याचे सांगून १३ फेब्रुवारी रोजी कार्तिकला उपचारासाठी अनोळखी महिला घेऊन गेली. त्यानंतर कार्तिकवर उपचार करण्यात येत असल्याचे सांगून त्यांना घरी जाण्यास सांगितले.
मीना सोनावणे ह्या पती सुनील सोनावणेसह घरी परतल्यावर कार्तिकच्या तब्येतीबाबत संपर्क सुरू ठेवला. सुरवातीला प्रतिसाद दिला गेला. त्यानंतर मुलगा पाहिजे असल्यास उपचारासाठी डॉक्टरला दिलेले २ लाख रुपये डिपॉझिट देण्याची मागणी केली. त्यानंतर फोन बंद केला. आपल्या मुलाचे बरे वाईट होईल म्हणून त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी स्वाती बोहरा यांच्यासह एका महिलेवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास चक्र फिरविली. पोलीस पथकाने बिहार येथून सोनीदेवी पासवान या महिलेला अटक केली. तसेच ज्या महिलेकडे बाळ दिले होते. तिच्याकडून बाळ सुखरूप ताब्यात घेतले. चौकट १७ मे पर्यंत पोलीस कस्टडी उल्हासनगर पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिलांना न्यायालया पुढे हजर केले असता, न्यायालयाने १७ मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.