ठाण्यात टीएमटीच्या धक्क्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:51 IST2022-02-12T05:51:06+5:302022-02-12T05:51:21+5:30
विवियाना मॉल समोरील घटना, बसच्या डाव्या बाजूचा धक्का यादव यांच्या स्कूटरला लागला

ठाण्यात टीएमटीच्या धक्क्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाला अटक
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) एका बसचा धक्का लागल्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या संजय यादव (३५, रा. बिरबल चाळ, वीर सावरकरनगर, ठाणे) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी टीएमटी चालक भास्कर दगडू साबळे (५३, रा. मुंबई) यांना राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.
यादव हे आपल्या स्कूटरवरुन मुंबई -ठाणे पूर्व द्रूतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरुन विवीयाना मॉलसमोरुन जात होते. त्याचवेळी हिरानंदानी इस्टेट ते ठाणे रेल्वे स्थानक या मार्गावरील टीएमटी बसही मुंबईच्या दिशेने (ठाणे रेल्वे स्थानकाकडे ) जात होती. याच बसच्या डाव्या बाजूचा धक्का यादव यांच्या स्कूटरला लागला. त्यामुळे ते खाली रस्त्यावर पडले. याचदरम्यान या बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तातडीने एका रुग्णवाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी वाहतूक शाखेच्या पोलिसांसह राबोडी पोलीसही दाखल झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक येवला यांनी टीएमटी चालक भास्कर साबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. अपघातग्रस्त टीएमटी बसही ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.