दुचाकीस्वार गटारात पडून जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST2021-09-26T04:44:17+5:302021-09-26T04:44:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील भुयारी गटारांवरील झाकणे गायब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कॅम्प नं. ३ ओटी ...

दुचाकीस्वार गटारात पडून जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील भुयारी गटारांवरील झाकणे गायब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कॅम्प नं. ३ ओटी सेक्शन भागात एक दुचाकीस्वार गुरवारी उघड्या गटारात पडून जखमी झाला आहे.
उल्हासनगर मनपा हद्दीत अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुख्य मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आली असून, वडोलगाव व शांतीनगर येथे जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. मागील आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण झाले. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खडेगोळवली येथे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येत आहे, तर तिसऱ्या टप्प्यात शहर अंतर्गत भुयारी गटारीची बांधणी करण्यात येणार आहे. सध्याच्या भुयारी गटारीची क्षमता संपल्यामुळे गटारे ओव्हरफ्लो होत आहेत.
कॅम्प नं. ३ ओटी सेक्शन परिसरसातील उघड्या गटारात गुरुवारी दुचाकीस्वार पडून गंभीर जखमी झाला. नगरसेवक पिंटो भतीजा यांनी मनपाकडे पाठपुरावा करून गटाराची दुरुस्ती करून नवीन झाकण बसवून घेतले. तर व्यापारी संघटनेचे दीपक छटवानी यांनी सी ब्लॉक साईबाबा मंदिरजवळील भुयारी गटारीवरील झाकण शनिवारी दुपारी मनपाकडून बसून घेतले. मोठा अपघात होण्यापूर्वी भुयारी गटारीवरील झाकणे बसविण्याची मागणी होत आहे.
ओव्हरफ्लो गटारांच्या सफाईवेळी सर्वाधिक त्रास
याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता रहेजा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तर सफाई कामगारांनी सफाईवेळी सर्वाधिक त्रास ओव्हरफ्लो झालेल्या भुयारी गटारांचा होत असल्याचे सांगितले. गटारांवर नवीन झाकणे बसविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
------------