हत्येप्रकरणी दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:11 IST2018-01-29T20:11:15+5:302018-01-29T20:11:18+5:30
एका खाजगी गाडीच्या चालकाची गोळया घालून हत्या केली. त्यानंतर त्याची गाडी घेऊन बिल्डर व त्याच्या चालकावर गोळीवार करुन जखमी केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

हत्येप्रकरणी दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
कल्याण-एका खाजगी गाडीच्या चालकाची गोळया घालून हत्या केली. त्यानंतर त्याची गाडी घेऊन बिल्डर व त्याच्या चालकावर गोळीवार करुन जखमी केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निकाल कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी दिला आहे.
या प्रकरणात सरकारी वकील दिलीप भांगरे यांच्यासह पोलिस अधिकारी पी. व्ही. मानकर, एस. बी. कुटे आणि एन. आर. हेमन यांनी कामकाज पाहिले. संजय खडकबहादूर दुबे हा बदलापूरमधील अनिल दरगड या बिल्डरकडे कामाला होता. काही कारणास्तव दरगड यानी संजयला कामावरुन काढून टाकले. या गोष्टीचा राग संजयच्या मनात होता. बिल्डरला धडा शिकविण्याच्या उद्देशाने संजयने त्याचा मित्र जवाहर कपिल मोर्या याच्या मदतीने 21 फेब्रुवारी 2010 रोजी अनिल वालवे याची खाजगी ट्रॅव्हल्सची गाडी बुक केली. या गाडीचा चालक राजेंद्र बनसोडे होते. या गाडीच्या चालकाला नेरुळ परिसरात गोळ्य़ा घालून जीवे ठार मारले. त्याच्या ताब्यातील झायलो गाडी घेऊन अनिल दरगड याच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा पाठलाग सुरु असल्याचे कळताच गाडीतील बिल्डरवर संजय व जवाहर या दोघांनी गोळीबार केला. या गोळीबारातून कसाबसा बचाव करीत दरगड हे रस्त्यालगत असलेल्या झाडी झुडपात पळून गेले. मात्र संजय व जवाहर यांनी दरगड यांच्या चालकावर गोळीबार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेतून दरगड यांचा चालक बचावला. या घटने प्रकरणी कुळगाव बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संजय व जवाहरला अटक केली. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणी कल्याण न्यायालयात हा खटला सुरु होता. त्याचा अंतिम निकाल आज लागला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना हत्ये प्रकरणी मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.