महिलेवर बलात्कार करुन लूट करणाऱ्या दाेघांना जन्मठेपेची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Updated: March 7, 2025 22:30 IST2025-03-07T22:30:12+5:302025-03-07T22:30:31+5:30
ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल: दाेघांनाही प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा

महिलेवर बलात्कार करुन लूट करणाऱ्या दाेघांना जन्मठेपेची शिक्षा
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका खासगी कंपनीतील २८ वर्षीय अधिकारी महिलेवर सामुहिक बलात्कार करुन लूट करणाऱ्या सुरेश पांडुरंग गोसावी (३२, रा. दहिसर पूर्व,मुंबई ) आणि उमेश उर्फ राकेश झाला ( ३१, रा.दहिसर पूर्व, मुंबई) या दाेघांनाही जन्मठेपेसह ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने शुक्रवारी सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याच्या सश्रम कारावासाची अतिरिक्त शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
ठाण्यातील घाेडबंदर राेड भागात राहणारी ही पिडीत महिला १९ डिसेंबर २०१७ राेजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास
मीरा राेड येथून ठाण्याकडे येण्यासाठी निघाली हाेती. त्यावेळी काशिमीरा नाका येथे जाणाऱ्या कारला हात देऊन त्या कारमध्ये ती बसली. या कारमध्ये आधीच एकजण बसलेला हाेता. कार चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला गायमुख बसस्टॉप पर्यंत नेले. तिथून परत यूटर्न घेत आधी तिच्याकडील माेबाईल आणि राेकड जबरदस्तीने काढून घेतली. नंतर तिला धमकावून मुंबई अहमदाबाद महामार्गावर नेऊन तिच्यावर चालकासह दाेघांनीही बलात्कार केला हाेता. नंतर तिचे सोन्याचे दागिने काढून घेऊन तिला पुन्हा वज्रेश्वरी येथे एका लॉजमध्ये नेले. तिथे तिने आरडाओरडा केल्यानंतर या दाेघांनीही तिथून पळ काढला.
याप्रकरणी काशीमीरा पाेलीस ठाण्यात बलात्कारासह जबरी चाेरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलिसांनी सुरेश आणि उमेश या दाेघांना अटक केली हाेती. याच खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायाधीश वसुधा भाेसले यांच्या न्यायालयात ७ मार्च २०२५ राेजी झाली. यामध्ये १९ साक्षीदार तपासण्यात आले. आराेपींना शिक्षा हाेण्यासाठी सरकारी वकील राजेंद्र पाटील आणि वर्षा चंदने यांनी जाेरदार बाजू मांडली. दाेघांनाही जबरी चाेरी आणि बलात्काराच्या गुन्हयात दाेषी धरुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तपासी अधिकारी म्हणून वैभव शिंगारे यांनी तर पेरवी अधिकारी म्हणून पाेलीस अंमलदार साईदास चव्हाण आणि अनिल मढवी यांनी काम पाहिले.