ठाण्यात दोघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता
By जितेंद्र कालेकर | Updated: July 27, 2023 21:36 IST2023-07-27T21:35:51+5:302023-07-27T21:36:07+5:30
मुसळधार पावसामुळे शाेधकार्यात अडथळे

ठाण्यात दोघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता
ठाणे :ठाणे शहरात दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये दाेघे जण बुडाले. पहिल्या घटनेत कळवा, पारसिक नगरमधील चिराग जोशी (१९) या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मिळाला तर दुसऱ्या घटनेत कळव्यातील शांतीनगर भागातील दोसा (३२) ही व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. चिराग हा मित्रांसोबत पोहण्यासाठी आणि दोसा हा मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेला असताना दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची शक्यता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवली.
चिराग हा बुधवारी सायंकाळी त्याचा भाऊ आणि तीन ते चार मित्रांसोबत ओवळ्यातील पानखंडा गावातील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने चिराग पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रासह भावाने त्याचा शोध घेतला. परंतु, ताे न मिळाल्याने या दुर्घटनेची माहिती त्यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तत्काळ कासारवडवली पोलिसांसह अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, टीडीआरएफ यांनी धाव घेत शोधकार्य सुरू केले. तीन तास शोध घेऊनही चिराग सापडला नाही. गुरुवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास चिरागचा मृतदेह आढळला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कासारवडवली पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठविला. दुसऱ्या घटनेत, कळव्यातील शांतीनगर येथील दोसा (३२) हा गुरुवारी सकाळी मित्रांसमवेत रेतीबंदर खाडीकिनारी मासे पकडण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो सकाळी ११:३० च्या सुमारास बुडाला. माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाच्या पथकांनी धाव घेतली. साधारण साडेचार तास शाेध घेऊनही ताे सापडला नाही. याचदरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोधकार्य सायंकाळी ४ वाजता थांबविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.