दोन सहायक आयुक्तांच्या बदल्या, अपर पोलीस आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:32 IST2018-06-26T01:32:43+5:302018-06-26T01:32:46+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण विभागाचे मुकूंद हातोटे आणि बाजीराव भोसले या दोन सहायक पोलीस आयुक्तांसह १६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी काढले

दोन सहायक आयुक्तांच्या बदल्या, अपर पोलीस आयुक्तांचे आदेश
जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण विभागाचे मुकूंद हातोटे आणि बाजीराव भोसले या दोन सहायक पोलीस आयुक्तांसह १६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी काढले. यामध्ये ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
ठाणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे (शोध -१) सहायक पोलीस आयुक्त हातोटे यांना याच विभागातील गुन्हे प्रतिबंधक शाखेत आणले आहे. तर प्रतिबंधक शाखेचे भोसले यांना आता शोध -१ मध्ये संधी देण्यात आली आहे. भोसले यांनी निरीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षकपदी असतानाही मुंबई, ठाण्यात अनेक नामचीन गुंडांना जेरबंद करून अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघड केले आहेत. त्यांच्या याच अनुभवाचा शोध १ शाखेला चांगला उपयोग होणार आहे.
ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांची डहाणू येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली झाल्याने त्यांच्या जागी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांना आणण्यात आले आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी धुमाळ यांची ठाण्याच्या अतिक्रमण विभागात बदली झाली आहे.
अंबरनाथचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ यांची जलद प्रतिसाद पथकात आणि कोनगावचे मंगेश सावंत यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर जितेंद्र आगरकर (बदलापूर), दिलीप गोडबोले (शिवाजीनगर) आणि सुरेंद्र शिरसाठ या तिघांना विशेष शाखेत आणण्यात आले आहे. गोडबोले यांच्या जागी आता शहर वाहतूक शाखेचे सुभाष कोकाटे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदाची संधी देण्यात आली आहे.
वर्तकनगर पोलीस ठाण्याचे रवीदत्त सावंत यांना शहर वाहतूक शाखेत तर मानपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांना वर्तकनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या अनघा देशपांडे यांना ठाणेनगर आणि ठाणेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश लांभाते यांना शहर वाहतूक शाखेत हजर व्हावे लागणार आहे.
याशिवाय, संजय सावंत (गुन्हे शाखा) यांना टिळकनगर, अफजलखान पठाण (शीळ डायघर ) यांना मालेकर यांच्या जागी वागळे इस्टेट, काशिनाथ चव्हाण (विशेष शाखा) यांना अंबरनाथ आणि राजेंद्र कदम यांना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या असून सर्व निरीक्षकांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत.