दोन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १२ वर्षांनंतर मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:41+5:302021-04-19T04:37:41+5:30
ठाणे : कामगार न्यायालय, ठाणे येथे दाखल केलेल्या खटल्यामध्ये पालघर जिल्ह्यातील दोन अंगणवाडी सेविकांना अखेर १२ वर्षांच्या परिश्रमानंतर ...

दोन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १२ वर्षांनंतर मिळाला न्याय
ठाणे : कामगार न्यायालय, ठाणे येथे दाखल केलेल्या खटल्यामध्ये पालघर जिल्ह्यातील दोन अंगणवाडी सेविकांना अखेर १२ वर्षांच्या परिश्रमानंतर न्याय मिळाला आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्यासह मागील वर्षांची भरपाई मिळवून देण्यात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाला यश मिळाले आहे, असे या संघाचे अध्यक्ष ॲड. एम. ए. पाटील व सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी लोकमत सांगितले.
जव्हार प्रकल्प- २ मध्ये कार्यरत यशोदा उदावत व रंजना भोये या अंगणवाडी सेविकांना या प्रकल्प कार्यालयाने मार्च २००७ साली बेकायदेशीररित्या कामावरून कमी केले होते. या प्रकल्पाच्या मनमानी निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने कामगार न्यायालय ठाणे येथे खटला दाखल केला होता. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आला होता. या कामगार न्यायालयात संघटनेने सतत पाठपुरावा केल्यामुळे २०१९ साली दोन्ही अंगणवाडी सेविकांना पूर्वपदावर रुजू करण्यासंबंधी कामगार न्यायालयाने आदेश दिला होता.
न्यायालयीन निर्णयासह या दोन्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २००७ पासून मान देण्याचा निर्णय कामगार न्यायालयाने दिला होता. या सेविकांना कामगार न्यायालयाच्या आदेशाने आता मानधनापोटी पाच लाख ६८ हजार ८२ रुपयांची भरपाई रक्कम मिळाली असून त्यांना आता पुन्हा कामावरही घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारात आनंदोत्सव असून या यशासाठी परिश्रम घेतलेल्या या संघटनेचे आभारही या सेविकांनी मानले आहेत.