कोरोना नियम मोडणाऱ्या अडीच हजार चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:39+5:302021-02-24T04:41:39+5:30
ठाणे : गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संबंधित ...

कोरोना नियम मोडणाऱ्या अडीच हजार चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका
ठाणे : गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल अडीच हजार वाहनांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या चार दिवसांत कारवाई करून सुमारे १२ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. वारंवार आवाहन करूनही वाहनचालकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन वाढले आहे. रिक्षातूनही दोन प्रवाशांना प्रवासाची मुभा असताना शेअर रिक्षाच्या नावाखाली चार ते पाच प्रवाशांची सर्रास वाहतूक केली जाते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक खासगी वाहनचालकांकडूनही नियमांचे उल्लंघन होत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार १९ ते २२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत रिक्षा, मोटारसायकल, मोटारकार आणि अवजड वाहने अशा दोन हजार ५२७ वाहनांवर १८ पथकांनी कारवाई करून त्यांच्या चालकांकडून सुमारे १२ लाखांचा दंड आकारला आहे. या कारवाईमध्ये सर्वाधिक १ हजार ९६९ रिक्षांपाठोपाठ १७८ दुचाकी, १६५ मोटारकार आणि २१५ अवजड वाहनांवर कारवाई केली आहे.
....................................
* याशिवाय, कर्णकर्कश आवाज करून वाहने हाकणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला. गेल्या चार दिवसांत अशा ७९ वाहनांवर कारवाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
................
‘‘वाहन चालकांनी वाहतूक नियमांसह कोविड १९च्या नियमांचा भंंग केल्यास अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध साथ प्रतिबंध कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे.’’
बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर