सव्वीस विद्यार्थ्यांना विषबाधा
By Admin | Updated: February 11, 2017 03:47 IST2017-02-11T03:47:01+5:302017-02-11T03:47:01+5:30
डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शिलोंडा येथील २६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारी ही मुले

सव्वीस विद्यार्थ्यांना विषबाधा
सुरेश काटे , तलासरी
डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शिलोंडा येथील २६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारी ही मुले वसतिगृहात राहतात. विषबाधा झाल्याचे लक्षात येताच वसतिगृहाच्या आधीक्षिकेने मुलांना तलासरी येथील दयानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. विषबाधेची घटना घडून २४ तासांनंतर डहाणू पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना जाग आली. याबाबत, पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
गुरुवारी संध्याकाळी विषबाधेने २६ मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत डहाणू पंचायत समितीचा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग वा इतर जबाबदार अधिकारी रुग्णालयात पोहोचले नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी रुग्णालयात जाऊन मुलांची माहिती घेतली आणि पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना माहिती दिली असता झोपलेले अधिकारी जागे झाले अन् अधिकाऱ्यांनी दयानंद हॉस्पिटलला भेट देऊन मुलाच्या तब्येतीची चौकशी केली.
या वेळी दवाखान्यात आलेले डहाणूचे गटविकास अधिकारी रमेश अवचार यांना सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांबाबत जि.प. सदस्य काशिनाथ चौधरी यांनी जाब विचारला. डहाणूचे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने तलासरीचे टीएमओ सुरेंद्र मडके रुग्णालयात आले. मुलांना विषबाधा कशाने झाली, याबाबत कारण स्पष्ट झाले नाही. मुलांनी मात्र सकाळी चवळी खाल्ल्यानंतर बोरांच्या बिया फोडून खाल्ल्याचे सांगितले.
दयानंद हॉस्पिटलमध्ये तेजल हडळ, अजय धोदाडे, दिव्या पवार, अनिशा वसावाला, रुणिता शेलार, सोनाली सांबर, अशिका माढा, खुशी भोये, प्रमिला करदोडे, साईनाथ वेडगा, आशीष पागी, श्रीनाथ धाडगे, ललिता अंधेर, आशीष रावते, रीना भावर, प्रणिता दळवी, मेनाली भोये, राशिला घोरखाना, नेहा सुतार, भरती कानल, आशीष माढा, जिग्नेश बातरा, दिलीप शनवर, रोशनी शेलार, रसिका वळवी, अलवेश गिंभल या मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
शिलोंडा येथे होली क्रॉस कॉन्व्हेंट
प्रेमांजली या संस्थेमार्फत ज्ञानमाता आदिवासी मुलामुलींचे विनाअनुदानित वसतिगृह चालवले जाते. या वसतिगृहातील विद्यार्थी जवळची जिल्हा परिषद शाळा शिलोंडामध्ये शिकतात. गुरुवारी सकाळी वसतिगृहात मुलांनी नाश्त्यामध्ये उकडलेली चवळी खाल्ली व शाळेत जाण्याची तयारी करत असतानाच मुलांना उलटी व मळमळ होऊ लागली. काही मुले शाळेत गेली, त्यांनाही हा त्रास होऊ लागल्याने ती परत वसतिगृहात आली.
२मुलांना उलटी, चक्कर, मळमळ होऊ लागल्याने वसतिगृहाच्या आधीक्षिका सिस्टर रेनिटा यांनी पहिली ते चौथीपर्यंतच्या ३१ मुलांना तलासरीच्या दयानंद हॉस्पिटलमध्ये गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता आणले. या वेळी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तत्काळ मुलांवर उपचार सुरू करून परिस्थिती आटोक्यात आणली. आपल्या शाळेतील मुलांना विषबाधा झाल्याचे समजताच शाळेचे मुख्याध्यापक लहानू चौधरी हेही तत्काळ रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.