टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा
By Admin | Updated: January 25, 2017 04:52 IST2017-01-25T04:52:36+5:302017-01-25T04:52:36+5:30
कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे

टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा
ठाणे : कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे आमचा टोल कधी बंद होणार याचा ठाणेकरांनी जाब विचारावा, असे जाहीर आवाहन ठाणे जिल्ह्यात टोलबंदीची चळवळ उभी करणाऱ्या ‘टिसा’ आणि ‘टोल विरोधी समिती’ने ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदारांना केले आहे.
‘टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा’, अशा शब्दात या समितीने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ठाण्यातील नेत्यांत हिम्मत असेल तर त्यांनी तो बंद करून दाखवावाच, असे समितीने म्हटले आहे.
कोल्हापूरकर टोल बंद करून दाखवू शकतात मग ठाण्यातील नेत्यांनी काय हातात बांगड्या भरल्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
विधानसभेच्या निवडणुकीत टोल बंदीबाबत वचन दिल्यानंतरही ठाणे जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे टोलबंदी झालेली नाही. मुंबई-ठाणेकरांचा पिच्छा टोल सोडत नसल्याने आगामी निवडणुकीपूर्वी ‘टोल हटवा, मते मिळावा’अशी व्यापक चळवळ गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातील ‘टिसा’ आणि अन्य ५५ संस्थांच्या माध्यमातून उभी राहिली आहे. दरम्यान, त्याच आशयाचे कार स्टीकर्स, फेसबुक, व्हॉटसअॅप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ तीव्र करण्याचे काम केले गेले आहे.
ठाणे शहराच्या प्रवेश व निर्गमननाक्यांवरील टोलनाक्यांमुळे शहरातील जनता, व्यावसायिक, डॉक्टर्स, वकील व सामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण आहे. तसेच राज्यातील इतर ठिकाणचे टोल याआधीच बंद झाले असताना मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवर वसुली अद्यापही सुरू आहे.
ठाणे शहरातील नागरिकांना मुंबईतील एकही पूल न वापरता सुद्धा गेली १८ वर्षे टोलचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. इतर नाक्यांवर शहरातील ५ कि.मी.च्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या सुविधा सुद्धा इतक्या वर्षात मिळाल्या नाहीत, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)