तुर्भे जनता मार्केटची सुरक्षा धोक्यात
By Admin | Updated: October 27, 2014 01:17 IST2014-10-27T01:17:11+5:302014-10-27T01:17:11+5:30
तुर्भे जनता मार्केटमधील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, अग्निशमन नियमांचेही मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे.

तुर्भे जनता मार्केटची सुरक्षा धोक्यात
नवी मुंबई : तुर्भे जनता मार्केटमधील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, अग्निशमन नियमांचेही मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे. दिवाळीत लागलेल्या आगीमध्ये जवळपास पाच दुकाने जळून गेली असून, भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मार्केटची सुरक्षाच धोक्यात आली आहे.
नवी मुंबईमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या बाजारपेठांमध्ये तुर्भे जनता मार्केटचा समावेश आहे. या ठिकाणी हार्डवेअर, गृहोपयोगी वस्तू, कपडे व इतर वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. रविवारी व सणांच्या काळात मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असते. ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही केले आहे. येथील गल्ल्या अरुंद झाल्या आहेत. दुकानांच्या बाहेरील जागाही व्यवसायासाठी वापरली जात आहे. येथील फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे. दिवाळीच्या दिवशी मार्केटमध्ये लागलेल्या आगीमध्ये पाच दुकानांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासही अडथळा निर्माण झाला होता.
जनता मार्केटमध्ये दुकानांची रचना अत्यंत चुकीची आहे. काही दुकानांमध्ये जाण्यासाठी अत्यंत चिंचोळा मार्ग आहे. मोठी आग लागली तर येथील नागरिकांना बाहेर पडण्यासही अडथळा होऊ शकतो. आग विझविता न आल्याने प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. पूर्ण मार्केटची सुरक्षा रामभरोसे सुरू आहे. महापालिका प्रशासनाने वेळेत मार्केटमधील अनागोंदी कारभार थांबविला नाहीतर भविष्यात गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)