‘ट्रायमॅक्स’ला तीन महिन्यांची मुदतवाढ
By Admin | Updated: May 9, 2017 00:56 IST2017-05-09T00:56:53+5:302017-05-09T00:56:53+5:30
लाखो रुपये बिलाच्या थकबाकीप्रकरणी ट्रायमॅक्स कंपनीकडून सेवा देताना टाळाटाळ केली जात असताना दुसरीकडे याच कंपनीला

‘ट्रायमॅक्स’ला तीन महिन्यांची मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : लाखो रुपये बिलाच्या थकबाकीप्रकरणी ट्रायमॅक्स कंपनीकडून सेवा देताना टाळाटाळ केली जात असताना दुसरीकडे याच कंपनीला मुदतवाढ देण्याचा निर्णय परिवहन समितीने शनिवारी घेतला. बहुचर्चेनंतर तीन महिन्यांची मुदतवाढ देताना याबाबतचा प्रस्ताव घेण्याच्या अनुषंगाने झालेल्या विलंबाप्रकरणी प्रशासनाला सर्वपक्षीय सदस्यांनी फैलावर घेतले होते. सदस्य रमेश म्हात्रे यांनी तर अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, तरच परिवहनचा कारभार सुधारेल, अशी मागणी करताना परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्यावर तोंडसुख घेतले.
ई-तिकीट प्रणालीचे कंत्राट मे. ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीला पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. या कंत्राटाची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे कंपनीला मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने दाखल केला. परिवहनचे पदसिद्ध सदस्य असलेले स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सुरुवतीलाच सध्याच्या बसच्या संचालनाचा आढावा घेतला. या वेळी बस आलटूनपालटून वापरल्या जात असल्याचे स्पष्टीकरण टेकाळे यांनी दिले. केडीएमटीत अनेक अधिकारी निष्क्रिय असून त्यांच्या बदल्या करा, अन्यथा परिवहनची अवस्था बैलगाडीसारखी होईल, अशी टीका त्यांनी केली.
अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने सदस्य नितीन पाटील यांनी लक्ष वेधले. तर, शनिवारी ई-तिकीट प्रणालीचे कंत्राट संपत असताना ऐनवेळी हा प्रस्ताव मुदतवाढीसाठी का आणला, याआधी याबाबतची कार्यवाही का झाली नाही, असा सवाल पाटील यांनी केला. पाच वर्षांत वेळ मिळाला नाही का, असा जाब म्हात्रे यांनीही विचारला. पाटील आणि सदस्य संजय राणे यांनीही मुदतवाढ देण्यास विरोध केला. परंतु, प्रशासनाच्या विनंतीनंतर मुदतवाढीचा निर्णय झाला. प्रशासनाने तत्काळ नवीन निविदा प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश सभापती संजय पावशे यांनी या वेळी दिले.