आश्रमशाळेचे आदिवासी विद्यार्थी झोपतात जमिनीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:14 IST2020-03-08T00:14:18+5:302020-03-08T00:14:32+5:30
आदिवासींमध्ये संताप : आयुक्तांना विचारणार जाब

आश्रमशाळेचे आदिवासी विद्यार्थी झोपतात जमिनीवर
ठाणे : शहापूर, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात आहेत. येथील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी बिछानाही नसल्याचे शहापूर तालुक्यातील टेंभा येथील आश्रमशाळेवरून उघड झाले, असे आदिवासी फाउंडेशनचे सचिव गुरूनाथ सहारे यांनी स्पष्ट केले.
टेंभा (वैतरणा) या आश्रमशाळेची दयनीय अवस्था व अस्वच्छतेत येथील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. कोंडवाड्याप्रमाणे या आश्रमशाळेच्या भिंतींना रंगरंगोटीही केलेली नाही. या वसतिगृहात खड्डेही आहेत. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बिछाना म्हणून गाद्याही नाहीत. सतरंज्या आणि थंडीपासून बचाव करणाऱ्या रग, चादरींचीही सोय नाही. विद्यार्थी एकमेकांजवळ झोपून थंडीचा बचाव करतानाचे विदारक चित्र या आश्रमशाळेत दिसून आले आहे. या शाळेचे संबंधित अधीक्षक, कर्मचाऱ्यांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्यांच्या या मनमानीविरोधात आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे सहारे यांनी लोकमतला सांगितले.