आदिवासीचा सर्पदंशाने मृत्यू
By Admin | Updated: September 29, 2015 01:09 IST2015-09-29T01:09:08+5:302015-09-29T01:09:08+5:30
बेहटवाडी या गावातील सोन्या राघो घाटाळ (५५) यांचा शनिवारी (२६ सप्टेंबर) सर्पदंशाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला.

आदिवासीचा सर्पदंशाने मृत्यू
मोखाडा : बेहटवाडी या गावातील सोन्या राघो घाटाळ (५५) यांचा शनिवारी (२६ सप्टेंबर) सर्पदंशाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला. परंतु, आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे या आदिवासीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताचे नातेवाईक रामदास बरफ यांच्याकडून केला जात आहे.
सोन्या राघो घाटाळ यांना सर्पदंश झाल्याने दुपारी उपचारासाठी आरोग्य पथक आडोशी या ठिकाणी नेण्यात आले होते. परंतु, तेथे सर्पदंशाच्या इलाजावर कोणती उपचार व्यवस्था नसल्याने तसेच येथील रुग्णवाहिका बंद असल्याने खाजगी वाहनांची व्यवस्था करून खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, येथे डॉक्टरांकडून या पेशंटवर प्रभावीपणे उपचार करण्यात आले नाही. फक्त सलाइन लावून काम भागवले, असा आरोप मृताच्या नातेवाइकांकडून केला जातो.
सर्पदंश झाल्यानंतर पेशंटची रक्त तपासणी म्हणजे बीटीसीटी केली जाते. यावरून, सर्प विषारी आहे की अविषारी, याची खात्री पटते. या दरम्यान लगेचच सर्पदंशावर असरदार असणारा एएसव्हीचा टेस्ट डोस दिला जातो. परंतु, यामध्ये उशीर झाल्यास किंवा डॉक्टरांकडून दुर्लक्ष झाल्यास मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.
यात धक्कादायक बाब म्हणजे उशीर झाल्यानंतर तसेच पेशंटची तब्येत खालावत असताना पुढील उपचारासाठी हलवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वेळी येथील रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला. यापुढे पैशांची चणचण भासणाऱ्या या आदिवासींची मोठी धावपळ उडाली आणि खाजगी गाडीची शोधाशोध करत असताना तसेच पुढील उपचारासाठी नेताना लगेचच सोन्या घाटाळ या आदिवासीचा मृत्यू झाला. यामुळे या मृत्यूला जबाबदार डॉक्टर की
आरोग्य विभागाची सिस्टीम, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून याच आरोग्य विभागाला
शासन कोट्यावधी रु.चा खर्च करत असताना डॉक्टरचा बेजबाबदारपणा, आरोग्य यंत्रणा यामुळे उपचाराच्या नावाखाली आदिवासींना जीव गमवावा लागत आहे. ही बाब संतापजनक आहे. यावर, कारवाईची मागणी मृतांचे नातेवाईक रामदास बरफ यांच्याकडून केली जात आहे. (वार्ताहर)