कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक वॉर्डन ६ महिने मानधनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:50 IST2018-09-09T02:50:18+5:302018-09-09T02:50:26+5:30
कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक वॉर्डन ६ महिने मानधनाविना
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालवताना ओढाताण होत असतानाच आता त्यांना गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा यक्षप्रश्न पडला आहे.
नेते येतात, अधिकारी येतात, आम्हाला ठिकठिकाणी पिटाळतात. सकाळी ९ पासून मध्यरात्रीपर्यंत काम करूनही महिनाकाठी अवघे पाच हजार रुपये मानधनही आम्हाला वेळेत मिळत नसेल, तर राबराब राबून उपयोग काय, असा सवाल कुटुंबीय आम्हाला करत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यासंदर्भात लक्ष घालतील का, असा सवाल हे वॉर्डन करत आहेत.
मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर कल्याण-शीळ रस्ता तसेच कल्याण-डोंबिवली शहरांतील अंतर्गत रस्त्यावर कोंडी वाढत आहे. त्यातही ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आम्ही काम करतो. पण, दरवेळेसच आम्हाला मानधनासाठी ताटकळत ठेवले जाते. दुसरीकडे कुठे नोकरी-व्यवसाय करायचा, तर या विचित्र ड्युटीमुळे वेळ मिळत नाही.
सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संसार करताना खूपच ओढाताण होते. जूनमध्ये मुलांच्या शाळा सुरू झाल्या, रक्षाबंधन उत्सव झाला, आता तर गणेशोत्सव तोंडावर आहे. पण, आमची ओंजळच रिकामी असल्याने करायचे तरी काय, असा सवाल त्यांनी डोंबिवली वाहतूक विभागातील अधिकाºयांकडे केला आहे.
वाहतूक विभागाच्या तत्कालीन अधिकाºयांची बदली झाल्याने नवीन अधिकारी आले आहेत. पण, अजून त्यांना येथील कोंडीचा, त्याच्या निपटाºयाचा अंदाज यायचा आहे. असे असताना आम्ही त्यांना केवळ मानधनासाठी तगादा लावणे, हे आम्हाला योग्य वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
- वाहतूक वॉर्डनना तातडीने आमच्याशी संपर्क साधायला सांगा. गणेशोत्सव त्यांनीही आवर्जून साजरा करावा. त्यांचे मानधन काढले जाईल.
- विनीता राणे, महापौर