परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर, ठाण्यातील खोपट बस स्थानकाची केली पाहणी

By जितेंद्र कालेकर | Updated: December 22, 2024 18:41 IST2024-12-22T18:41:12+5:302024-12-22T18:41:43+5:30

प्रवाशांनीही नालासोपारा-दापोली आणि मंडणगड या गाड्या तब्बल दोन तास लेट झाल्याची तक्रार केली.

Transport Minister Pratap Sarnaik in action mode, inspected Khopat bus station in Thane | परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर, ठाण्यातील खोपट बस स्थानकाची केली पाहणी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर, ठाण्यातील खोपट बस स्थानकाची केली पाहणी

ठाणे: राज्याच्या राज्याच्या परिवहन मंत्री पदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांना देण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी सरनाईक यांनी पहिल्याच दिवशी अचानक ठाण्यातील खोपट बस स्थानकाची पाहणी केली. प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचनाही त्यांनी केल्या. प्रवाशांनीही नालासोपारा-दापोली आणि मंडणगड या गाड्या तब्बल दोन तास लेट झाल्याची तक्रार केली. तेव्हा गाड्या वेळेवर सोडण्याचे आदेशही त्यांनी दिले. विश्रांतीगृहात कर्मचाऱ्यांना गरम पाणी आणि चांगल्या सुविधा देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

परिवहन विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी सरनाईक यांनी ठाण्यात अचानक हा पाहणी दाैरा केल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्यासाठी काही सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही याच्या पडताळणीसाठी सरनाईक यांनी खोपट एसटी बस आगाराला भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांचा आढावा घेतला.

"गर्दुल्यांचा वावर थांबवा"
खोपट आगाराच्या आवारातील अतिक्रमण काढण्याचे तसेच गर्दुल्ल्याचा वावर त्वरित थांबविण्याच्या सूचना सरनाईक यांनी थेट नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनाच फोन करुन दिल्या.

"कर्मचाऱ्यांना गरम पाणी देता की नाही?"
खोपट आगारातील चालक वाहक यांच्या विश्रांतीगृहाची, स्थानकाच्या स्वच्छतेची सरनाईक यांनी पाहणी केली. याठिकाणच्या अस्वच्छेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. विश्रांतीगृहात चालक वाहक यांना गरम पाणी देता की नाही? असा सवाल त्यांनी ठाणे आगार २ व्यवस्थापक राहूल बोरसे यांना केला. बोरसे यांनी होकार दिल्यावर ते दाखविण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले. प्रत्यक्षात सोलर सिस्टिमच गरम पाणी मिळत नसल्याची बाब निदर्शनास आल्यावर मंत्र्यांना खोटी माहिती का देता? असा सवाल केल्यावर मात्र अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

"गाड्या वेळेवर सोडा"
नालासोपारा- दापोली आणि तिरे, मंडणगड सकाळी ९ वाजताच्या गाड्या ११ पर्यंत आलेल्या नसल्याची तक्रार प्रवाशांनी थेट परिवहन मंत्र्यांकडे केली. या गाड्या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गाड्या वेळेत सोडा, प्रवाशांच्या सुविधेकडे लक्ष द्या, असे आदेशही सरनाईक यांनी यावेळी केल्या. राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन व समस्यांचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानक प्रमुख विठ्ठल पतंगे, आगार व्यवस्थापक राहुल बोरसे आणि डीटीओ रमेश बांधल आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

"ठाण्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनीच करावे"
जिल्ह्याच्या शिवसेनेचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पालकमंत्री म्हणूनही त्यांनी चांगली जबाबदारी पार पाडली. पालकमंत्री पद शिंदे यांच्याकडे आल्यापासून अनेक विकासकामे झाली. त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळातही करोडो रुपयांचा निधी जिल्हयाला आला. उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनीच ठाण्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी सरनाईक यांनी करुन पालकमंत्री पदावर अप्रत्यक्षपणे शिवसेनेने दावा केल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Transport Minister Pratap Sarnaik in action mode, inspected Khopat bus station in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.