‘आरटीओ’ची पारदर्शक वाटचाल!

By Admin | Updated: March 14, 2017 01:52 IST2017-03-14T01:52:33+5:302017-03-14T01:52:33+5:30

वाहन नोंदणी आणि शिकाऊ परवाना देणे, ही परिवहन विभागातील दोन्ही महत्त्वाची कामे आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे

Transparent way of RTO! | ‘आरटीओ’ची पारदर्शक वाटचाल!

‘आरटीओ’ची पारदर्शक वाटचाल!

ठाणे : वाहन नोंदणी आणि शिकाऊ परवाना देणे, ही परिवहन विभागातील दोन्ही महत्त्वाची कामे आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे. या विभागाचे कामकाज पारदर्शक होण्यास या प्रक्रियेमुळे मदत होणार आहे.
वाहन नोंदणी करण्यासाठी आणि वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना परिवहन विभागाच्या कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. दलालांसाठी सोयीची असलेली ही पारंपरिक प्रक्रिया हद्दपार करण्यासाठी परिवहन विभागाने पाऊले उचलली आहेत. त्यासाठी ही कामे आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, त्याकरिता तांत्रिक बदल करण्याची प्रक्रिया राज्यभरातील अनेक कार्यालयांमध्ये वेगात सुरू आहे. सध्या राज्यातील मोजक्या कार्यालयांमध्येच ही कामे आॅनलाईन केली जातात. त्यातही ही कार्यालये एकमेकांशी जोडलेली नसल्याने माहितीचे एका ठिकाणी संकलन होत नाही.
नवीन पद्धतीनुसार जुन्या अथवा नवीन वाहन नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया आता आॅनलाईन पद्धतीने करता येणार आहे. संबंधित सर्व कागदपत्रांपासून आवश्यक शुल्कही आॅनलाईन भरावे लागणार आहे. परिवहन विभागातील वाहन निरीक्षक केवळ वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करतील. त्याखेरिज अन्य कोणत्याही कामासाठी वाहनधारकांना आरटीओच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत.
शिकाऊ परवान्यासाठी देखील अशीच पद्धत अवलंबिली जाणार आहे. परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना सर्व कागदपत्रे आॅनलाईन पद्धतीने सादर करून, आवश्यक शुल्कदेखील आॅनलाईनच भरावे लागणार आहे. केवळ वाहन चालविण्याची चाचणी देण्यासाठी नागरिकांना कार्यालयात जावे लागणार आहे. ही चाचणी दिल्यानंतर शिकाऊ परवाना नागरिकांना घरपोच मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसातच नव्या पद्धतीने काम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Transparent way of RTO!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.