तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका २६ वर्षीय प्रवाशाला मोबाईल चोरामुळे पाय गमवावा लागला. ट्रेनमधून प्रवास करत असताना तरुण दारात उभा होता. शहाड आणि आंबिवली दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला उभ्या असलेल्या मोबाईल चोराने प्रवाशाच्या हातावर फटका मारला आणि मोबाईल हिसकावला. पण, या दरम्यान तरुणाचा तोल गेला आणि तो खाली पडला. खाली पडल्यानंतर तरुणाला चोरट्यांनी मारहाणही केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गौरव रामदास निकम असे रेल्वेतून पडून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नाशिकचा आहे. तो तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करत होता. कल्याण भागातील शहाड ते आंबिवली रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रविवारी ही घटना घडली.
रेल्वेच्या चाकाखाली आला पाय
गौरव रेल्वेच्या दारात उभा होता. त्यावेळी मोबाईल चोराने त्याच्या हातावर जोरात फटका मारला आणि मोबाईल हिसकावला. अचानक घडलेल्या प्रकारानंतर तरुणाचा तोल गेला. तो धावत्या रेल्वेतून खाली कोसळला आणि रेल्वेच्या चाकाखाली त्याचा डावा पाय चिरडला गेला.
२० हजार रुपयेही पळवले
गौरव जखमी अवस्थेत खाली पडला. त्यानंतर मोबाईल चोरट्याने त्याला लाठीने मारहाण केली आणि त्याच्याजवळचे २० हजार रुपये घेऊन फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.