वाहतूक शाखेचा दूरध्वनी ‘डेड’

By Admin | Updated: March 23, 2017 01:21 IST2017-03-23T01:21:37+5:302017-03-23T01:21:37+5:30

पूर्वेतील वाहतूक नियंत्रण शाखेतील दूरध्वनी बिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे. सध्या शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न

Traffic branch telephone 'dead' | वाहतूक शाखेचा दूरध्वनी ‘डेड’

वाहतूक शाखेचा दूरध्वनी ‘डेड’

डोंबिवली : पूर्वेतील वाहतूक नियंत्रण शाखेतील दूरध्वनी बिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे. सध्या शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला आहे. कोंडी व बेशिस्त वाहनचालकांबाबत तक्रार करायची झाल्यास संपर्क साधायचा कुठे, असा यक्षप्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र, दूरध्वनी नेमका कशामुळे बंद आहे, याचीही कल्पना तेथील अधिकाऱ्यांना नाही. त्यावर, तातडीने पत्रव्यवहार करून माहिती घेतली जाईल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
केडीएमसी आणि वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि ढिसाळ नियोजन, यामुळे शहरातील वाहतूकव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन, सिग्नल यंत्रणेचा अभाव याबरोबरच बेशिस्त वाहनचालक यामुळे कोंडीत भर पडत आहे. वाहतूकव्यवस्थेत सुधारणा होत नसल्याने मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. रिक्षाचालकाने होमगार्ड महिलेला केलेल्या मारहाणीच्या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.
वाहतूक शाखेतील दूरध्वनी बंद असल्यामुळे नागरिकांना संपर्क साधण्यास अडचण येत आहे. वाहतूकव्यवस्था, कोंडी, बेशिस्त वाहनचालक याबाबत तक्रार करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी जाहीर करून तक्रारीसंदर्भात थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जात होती. परंतु, सध्या हे चित्र पाहावयास मिळत नाही. दरम्यान, ८०० रुपयांच्या आसपास बिल थकल्याने दूरध्वनी बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Traffic branch telephone 'dead'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.