उल्हासनगर - कॅम्प नं-४, गुरुनानक शाळा परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्यांची ऑनलाईन ५ कोटी ७७ लाखाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर गुरुनानक शाळा परिसरात विष्णू परसराम कोटवाणी हे कुटुंबासह राहत असून ते व्यवसायाने व्यापारी आहेत. १४ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप कॉल येऊन शेअर्स, आयपीओ खरेदी विक्रीवर जास्त परतावा मिळण्याचे आमिष अज्ञात इसमाने दाखविले. त्यासाठी बीएफएसएल व आरपीएमटीए हे ऍप डाउनलोड करण्यास लावून वेळोवेळी ऑनलाईन वेगवेगळ्या बँकेत पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरूनही कोणताही परतावा मिळत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे कोटवाणी यांच्या लक्षात आले. त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार कथन केला. विठ्ठलवाडी पोलिसांनी कोटवाणी यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमावर ५ कोटी ७७ लाख २ हजार रुपयाने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.