मुलीवर अत्याचार; तिच्या आईचा विनयभंग करणाऱ्या भोंदूबाबास अटक
By Admin | Updated: September 30, 2015 00:05 IST2015-09-30T00:05:40+5:302015-09-30T00:05:40+5:30
भूत पिशाच्च उतरण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या आईचा विनयभंग केल्याची घटना ठाण्यात घडली

मुलीवर अत्याचार; तिच्या आईचा विनयभंग करणाऱ्या भोंदूबाबास अटक
ठाणे : भूत पिशाच्च उतरण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या आईचा विनयभंग केल्याची घटना ठाण्यात घडली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या भोंदूबाबाला मुंबईतून अटक केली. त्याला १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रामलाल सुखदेव शर्मा उर्फ मिस्त्री बाबा (४०) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव असून तो मुंबईच्या धारावीत राहणारा आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील ओवळा येथील फिर्यादींच्या बहिणीच्या मैत्रिणीच्या ओळखीतून तो रविवारी फिर्यादीच्या ठाण्यातील घरी आला होता. याचदरम्यान, त्याने मुलीवरील भूत पिशाच्च काढण्यासाठी मंत्रपठन करण्याचा बहाणा करून किचनमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ३५ वर्षीय फिर्यादींनाही किचनमध्ये नेहून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी नरबळी अणि इतर अमानुष अनिष्ट व प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अन्वये गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक केली. त्याने यापूर्वी असे काही कृत्य केले आहेत का? याचा तपास सुरु असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)