आज ढोल वाजणार!
By Admin | Updated: March 24, 2017 01:10 IST2017-03-24T01:10:51+5:302017-03-24T01:10:51+5:30
गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथकांचा समावेश करण्याचा विषय शुक्रवारी निकाली निघण्याची शक्यता आहे.

आज ढोल वाजणार!
ठाणे : गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथकांचा समावेश करण्याचा विषय शुक्रवारी निकाली निघण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चेसाठी पथकांना बोलवल्याचे आयोजक सांगत असले तरी गुरूवारी रात्रीपर्यंत निमंत्रण नसल्याने पथकांनी या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मनसेने मात्र ढोल-ताशा पथकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याची भूमिका जाहीर केली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या पथकांना पाठिंबा देत निर्णय बदलल्याचे सांगितले, तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाऊन आयोजकांनी स्वत:वर गुन्हे कसे दाखल करून घ्यायचे असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केल्याने त्या पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याचे दिसून आले.
स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथके नसतील, असा निर्णय घेतल्याचे ठाण्यातील आयोजकांनी जाहीर केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. त्यानंतर सारवासारव करत त्यांनी पथकांशी चर्चा करण्याची भूमिका जाहीर केली. शिवाय स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्यांनी त्यातील कायदेशीर कारवाईची जबाबदारी आमच्यावर असेल, असे हमीपत्र भरून देण्याचा त्यांचा मुद्दा अनेक मंडळांच्या पचनी पडलेला नाही. ठाण्यातील तरूणाईनेही ढोल-ताशा पथकांचीच भूमिका उचलून धरली असून ही पथके नसतील, तर स्वागतयात्रेला काय अर्थ आहे, असा सवाल केला. ‘लोकमत’ने या विषयाशी संबंधित सर्व बाजू मांडल्यानंतर गेले दोन दिवस सोशल मीडियावर यावरून चर्चेला तोंड फुटले आहे.
मनसेने मात्र या वृत्ताची दखल घेत ढोल-ताशा पथकांसोबत उभे राहण्याची तयारी दाखवली. प्रसंगी चौकाचौकात ढोल वाजवून नववर्ष स्वागतयात्रेचे स्वागत करु, अशी भूमिका घेतली आहे. समाजातील काही लोकांनी सुसंस्कृतपणाचा मुखवटा घेतल्याने, अशा लोकांमुळेच पारंपरिक वाद्ये आणि वादनकला लुप्त होण्याची वेळ आल्याचा टोला मनसेचे शहरअध्यक्ष अविनाश जाधव यांनी लगावला. पण असे लोक समाजात एक टक्का आहेत. उर्वरित ९९ टक्के लोक कार्यक्रमाची सुरूवात ढोल-ताशा पथकानेच करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)