जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमध्ये आज शिवस्वराज्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST2021-06-06T04:29:55+5:302021-06-06T04:29:55+5:30
ठाणे : येथील जिल्हा परिषदेत कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समिती कार्यालयांत आणि जिल्ह्यातील सर्व ...

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमध्ये आज शिवस्वराज्य दिन
ठाणे : येथील जिल्हा परिषदेत कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समिती कार्यालयांत आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी ९ वा. येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात येणार आहे.
राज्यभर प्रथमत:च हा कार्यक्रम एवढ्या भव्य स्वरुपात होत आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाचे जि. प., पं. स. व ग्रा. पं. स्तरावर नियोजनाच्या दृष्टीने पूर्वतयारी बैठक घेऊन त्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्येदेखील उत्साहाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम करताना शासनाने कोविड-१९ चे निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत, राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतन राहावे म्हणून महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरून घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्तेही झाले. तो हा शुभदिन होय.