ठाण्यात २१ मार्गांवर टीएमटीची ‘महिला स्पेशल’ धावणार!

By Admin | Updated: May 31, 2016 03:06 IST2016-05-31T03:06:58+5:302016-05-31T03:06:58+5:30

मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना महिला स्पेशल बस सुरू करण्याची सूचना केल्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेने त्यानुसार पावले उचलली आहेत

TMT's 'women special' will run on 21 routes in Thane | ठाण्यात २१ मार्गांवर टीएमटीची ‘महिला स्पेशल’ धावणार!

ठाण्यात २१ मार्गांवर टीएमटीची ‘महिला स्पेशल’ धावणार!

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना महिला स्पेशल बस सुरू करण्याची सूचना केल्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेने त्यानुसार पावले उचलली आहेत. कोणत्या मार्गांवर किती महिला प्रवासी रोज टीएमटी बसने प्रवास करतात, कोणत्या रूटवर महिलांची संख्या अधिक आहे, याचीही चाचपणी केली जात आहे. यासाठी टीएमटीने गेल्या आठवड्यात २१ रूटची चाचपणी करून याच मार्गांवर महिला स्पेशल सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे.
मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा केली आहे. परंतु, हे मार्ग आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने योग्य ठरू शकतात का, याचाही अभ्यास केला जात आहे. आधीच आमदनी घटल्याने परिवहनचे उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडलेले आहे. त्यात, या स्पेशलला महिलांचा कितपत प्रतिसाद लाभणार, हेदेखील पाहण्यात येणार आहे. कारण आधीच तोट्यात आणि बसची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांना चांगली सुविधा देण्यात टीएमटी अपयशी ठरली आहे. त्यामुळे या महिला स्पेशलचा फायदा होईल का, याबाबत प्रशासनातच संभ्रमाचे वातावरण आहे.
ठाणे परिवहन सेवेत ३१३ बस असून त्यातील सुमारे १०० हून अधिक आजघडीला बंद अवस्थेत आहेत. काही बस तर किरकोळ कारणांसाठी मागील कित्येक महिन्यांपासून आगारात धूळखात पडून आहेत. वागळे आणि कळवा आगारांतून रोज १८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत.
रस्त्यांवर धावणाऱ्या अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची संख्यादेखील मागील काही वर्षांत कमी झाली आहे. काही मार्गांवर तर आजही अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रवाशांना बसची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे आता प्रवाशांना इतर पर्यायांचा वापर करावा लागत आहे.

Web Title: TMT's 'women special' will run on 21 routes in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.