ठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत असताना प्रवाशांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजारांवरून थेट १ लाख ६८ हजारांवर आली आहे. अनेक बस या किरकोळ दुरुस्तीच्या कारणांमुळे डेपोतून बाहेर पडत नसल्याने प्रवासी संख्या घटत असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ही बाब समोर आली आहे. या अहवालात टीएमटीचादेखील तपशील दिला आहे. मागील तीन वर्षांत प्रवाशांची संख्या सातत्याने घसरत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.त्यातही पर्यावरण संवर्धनासाठी सीएनजीच्या बसला प्राधान्य देण्याचे धोरण असले तरी २०१२-१३ मधील सीएनजी बसची संख्या १२८ इतकीच आहे. डिझेलवर चालणाऱ्या बसची संख्या मात्र १८५ वरून २२५ इतकी वाढली आहे. बस वाढल्या असल्या तरी डिझेलचा वापर मात्र कमी झाला आहे. २०१२-१३ मध्ये १८५ बससाठी ९ हजार ५१६ लीटर डिझेल वापरले जात होते. तर, यंदा बस २२५ असल्या तरी डिझेलचा खप ८ हजार ९७० इतका आहे. त्यामुळे बस रस्त्यावर धावत नसल्याचे स्पष्ट होत आहे. टीएमटीच्या सुमारे ८० च्या आसपास बस या दुरुस्तीअभावी कार्यशाळेतच धूळखात पडून असतात. किरकोळ साहित्यसुद्धा दुरुस्तीसाठी उपलब्ध होत नाही. कामचुकार कर्मचारी बसेसच्या मेंटनन्सकडे लक्ष देत नाही. अधिकाऱ्यांचे बससेवा आणि येथील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. असे अनेक मुद्दे या अहवालात नमूद केले आहेत. २०१२-१३ मध्ये टीएमटी बसेसचे ७४ अपघात नोंदवले गेले होते. त्यात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, २०१३-१४ मध्ये ६२ अपघात झाले असून त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर, मागील वर्षी ७५ अपघातांत चौघांचा मृत्यू झाला. यंदा ५९ अपघातांमध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. निवृत्तीमुळे टीएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. (प्रतिनिधी)
टीएमटीचे प्रवासी घटले
By admin | Updated: December 22, 2016 06:07 IST