आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर टीएमटी उपव्यवस्थापकांना हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST2021-03-04T05:15:31+5:302021-03-04T05:15:31+5:30
ठाणे : ठामपाच्या परिवहन सेवेत गेली अनेक वर्षे उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या दिलीप कानडे यांना अखेर सोमवारी ...

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर टीएमटी उपव्यवस्थापकांना हटवले
ठाणे : ठामपाच्या परिवहन सेवेत गेली अनेक वर्षे उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या दिलीप कानडे यांना अखेर सोमवारी पदावरून दूर करण्यात आले असून त्यांच्या जागी शशिकांत धात्रक यांची नियुक्ती केली आहे. कानडे यांना न हटविल्यास धरणे आंदोलनाचा इशारा परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
प्रचंड खर्च करूनही गेल्या दहा वर्षांत ही सेवा तोट्यातच चालली आहे. परिवहन उपव्यवस्थापक कानडे हे केवळ खुर्ची उबवण्याचे काम करीत आहेत. सदस्यांनी दिलेल्या पत्राला ते केराची टोपली दाखवीत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा मंगळवारी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अश्रफ- भाईसाहब, गटनेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या सहकार्याने परिवहन मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खान यांनी शुक्रवारी सभापती विलास जोशी यांची भेट घेऊन दिला होता.
यानंतर परिवहन व्यवस्थापक ज्ञानेश्वर ढेरे यांनी सोमवारी एका पत्रान्वये दिलीप कानडे यांना पदावरून दूर केले आहे. यासंदर्भात शमीम खान यांनी टीएमटीच्या स्थापनेपासून ही सेवा कधीच नफ्यात आली नाही. काही अधिकाऱ्यांमुळे ती डबघाईला आली आहे. अशा अधिकाऱ्यांविरोधात आपण कायम लढा देणार आहोत, असे सांगितले.