टिटवाळा, ग्रामीण भागांत पाच तास खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:24+5:302021-04-30T04:51:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : मोहने फिडर येथून गोवेली सबस्टेशन येथे जाणाऱ्या मुख्य विद्युत लाइनवर बुधवारी सायंकाळी कावळा चिकटल्याने ...

टिटवाळा, ग्रामीण भागांत पाच तास खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : मोहने फिडर येथून गोवेली सबस्टेशन येथे जाणाऱ्या मुख्य विद्युत लाइनवर बुधवारी सायंकाळी कावळा चिकटल्याने स्पार्किंग होऊन खांबाखाली आग लागली. यामुळे टिटवाळा शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पाच तास खंडित झाला होता. ऐन उन्हाळ्यात ही घटना घडल्याने वीजग्राहकांना काळोखाबरोबरच उकाड्याचा सामना करावा लागला.
माेहने फिडर येथून गोवेली सबस्टेशन येथे मुख्य वीजवाहिनी जाते. आर. एस. डेअरी फार्मच्या मागे माळरानावर वीजवाहिनीवर कावळा बसल्याने झालेल्या स्पार्किंगमुळे खांबाखालील गवताला आग लागली. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धीरजकुमार धुवे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग काही आटोक्यात येत नव्हती. अखेर कल्याण येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. यावेळी एक बाब निदर्शनास आली की, लगतच्या गेल इंडिया कंपनीच्या पाईपलाईनमधून गॅस गळती होत असल्याने आग वाढत होती. दरम्यान, या घटनेमुळे गेल कंपनीला गॅस गळती नेमकी कुठे होत आहे, याचा शोध लागला.
परंतु, या घटनेमुळे टिटवाळा व ग्रामीण भागातील ५६ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणला जवळ-जवळ पाच तास लागले.
-------------------