आजपर्यंत हजारो न्याय निर्णय भारताच्या अनेक भाषांमध्ये - न्या. अभय ओक
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 18, 2025 17:40 IST2025-05-18T17:40:25+5:302025-05-18T17:40:43+5:30
Thane News: मागील तीन वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन इंग्रजीमध्ये दिलेल्या निर्णयाचा भारतातील प्रमुख भाषेमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेतलेला असून आजपर्यंत हजारो न्याय निर्णय भारताच्या अनेक भाषेमध्ये भाषांतरित केलेला आहे.

आजपर्यंत हजारो न्याय निर्णय भारताच्या अनेक भाषांमध्ये - न्या. अभय ओक
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - मागील तीन वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन इंग्रजीमध्ये दिलेल्या निर्णयाचा भारतातील प्रमुख भाषेमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेतलेला असून आजपर्यंत हजारो न्याय निर्णय भारताच्या अनेक भाषेमध्ये भाषांतरित केलेला आहे. तसेच मागील ३० वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायालयापर्यंत मराठीमध्येच काम केले जाते. आज उपलब्ध असलेल्या साधनांमुळे कायद्याचा अभ्यास करणे, शोध करणे, त्याचा अर्थ समजून घेणे व कमी वेळेत अनेक न्यायनिवाडे यांचे आकलन करणे फार सोपे झाले असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.
विद्या प्रसारक मंडळ टीएमसी विधी महाविद्यालयाचा ५० व्या बॅचचा पदवी प्रदान सोहळा न्या. ओक यांच्या हस्ते पार पडला. ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल म्हणाले की, विधी व्यवसाय हा फार कष्टाने व नियमित अभ्यासानेच करता येतो. महाराष्ट्र व गोवा राज्य अधिवक्ता मंडळाचे माजी अध्यक्ष गजानन चव्हाण व सुदीप पासबोला यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर अधिवक्ता मंडळ त्यांना मदत करेल अशी ग्वाही दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर म्हणाले की, विधीशी संबंधित सर्व पुस्तके, माहिती व न्याय निर्णय हे सामान्य नागरिकांसाठी मराठी भाषेमध्ये असणे फार आवश्यक आहे व यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे व मराठी भाषेमध्ये कायद्याचे रूपांतर करून सामान्य नागरिकास ते उपलब्ध करून द्यावेत.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, विद्या प्रसारक मंडळाचे सचिव अभय मराठे यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीविद्या जयकुमार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या शेवटी विधी महाविद्यालयाच्या १५० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कामत यांनी केले तसेच ओळख प्रा. विनोद वाघ, यतीन पंडित व हेतल मीशेरी यांनी करून दिली व आभार प्रदर्शन डॉ. रूपाली जामोदे यांनी केले.