ठाण्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढणार

By Admin | Updated: June 21, 2016 01:24 IST2016-06-21T01:24:47+5:302016-06-21T01:24:47+5:30

ठाणे जिल्ह्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील काही दिवस पावसाच्या अधूनमधून सरी कोसळतील आणि आठवडाभरानंतरच संततधारेचा अनुभव येईल

The thunderstorms will increase in the week | ठाण्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढणार

ठाण्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढणार

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील काही दिवस पावसाच्या अधूनमधून सरी कोसळतील आणि आठवडाभरानंतरच संततधारेचा अनुभव येईल, असेही या अंदाजात म्हटले आहे. दरम्यान, सोमवारीही जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने अधूनमधून हजेरी लावली.
नद्या-धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने अजून काही दिवस पाणीटंचाई कायम राहण्याची चिन्हे आहेत. धरणे आणि नद्यांच्या परिसरात आठवडाभर जोरदार पाऊस झाला तरच त्यानंतर पाण्याची पातळी वाढेल आणि पुरेसा साठा वाढला तर १५ जुलैपर्यंत वाढलेल्या साठ्याचा अंदाज घेऊन सध्याची ४५ टक्के पाणीटंचाई मागे घेण्याचा निर्णय घेतलाजाईल, असे विविध पाणीवाटप संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हवामान खात्याचा अंदाजानुसार, पुढील आठवडाभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. पुढील आठवड्यात मात्र अंधारून येऊन जोरदार पाऊस कोसळेल. संततधारेचा अनुभव जिल्हावासीयांना येईल.
रात्री काही काळ आणि सकाळी कोसळलेल्या सरींचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला काही काळ बसला. लोकल वाहतूक दहा ते १५ मिनिटे विस्कळीत होती. रस्त्यावरील वाहतूकही मंदगतीने सुरू होती. (प्रतिनिधी)

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पावसाने सकाळी ११ वाजल्यापासून जोरदार हजेरी लावली. तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचले होते. सर्व नाले भरून वाहत होते. ऐन शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही भिजत शाळेत जाणे पसंत केले. तर काहींनी भिजत घर गाठले. दुपारी २ नंतर पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा सायंकाळी ५ वाजता हलका पाऊस पडला. पावसाच्या हजेरीमुळे शेतीची कामे लवकरच सुरू होणार आहेत.

Web Title: The thunderstorms will increase in the week