वालधुनी नदीचा घोटला गळा!
By Admin | Updated: May 23, 2016 02:42 IST2016-05-23T02:42:24+5:302016-05-23T02:42:24+5:30
अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगडाच्या डोंगरावरुन वाहात येणाऱ्या ओढ्यांतूनच वालधुनी नदीचा उगम झाला आहे. या नदीचा प्रवाह अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणमार्गे खाडीला मिळतो.

वालधुनी नदीचा घोटला गळा!
अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगडाच्या डोंगरावरुन वाहात येणाऱ्या ओढ्यांतूनच वालधुनी नदीचा उगम झाला आहे. या नदीचा प्रवाह अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणमार्गे खाडीला मिळतो. पूर्वी या वालधुनी नदीला स्वत:चे वैभव होते. मात्र आज ही नदी नाल्यात रुपांतरित झाली आहे. या नदीला ठिकठिकाणी प्रदूषणाने विळखा घातला असून, सांडपाण्याचे तिचा जीव गुदमरला आहे. तिला त्या पाशातून सोडविणे अवघड झाले आहे. आता तर वालधुनी नदीचा प्रवाहच बंद करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर नदीचे पाणी ज्या धरणात साठते ज्या जीआयपी टँकलाही प्रदूषणाचा विळखा बसला आहे. टँकमध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाशेजारीच रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने उभारले गेले आहेत. त्यामुळे नदीसोबत आता तिचा उगमही प्रदूषित झाला आहे. हेही कामी म्हणून की काय नदीच्या उगम मार्गावर ५० एकर जागेत एक मोठी कंपनी उभारण्यात येत असल्याने आता ही नदीच नामशेष होते की काय, अशी भीती पर्यावरणवाद्यांना वाटते आहे.
वालधुनी नदी ही पूर्वीपासूनच पावसाळ्यात वाहती होणारी नदी. या नदीचा प्रवास सुरु होतो तो मलंगगडावरील डोंगर दऱ्यांतून. अनेक लहान-मोठे पावसाळी ओढे हे अंबरनाथ तालुक्यातील बहनोली गावाजवळ एकत्रित येतात. तेथून ही नदी कल्याण खाडीपर्यंत वाहात येई. येताना अनेक छोट्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवे. त्यांच्या शेतीला आधार देई. या पट्ट्यातील निसर्गसंपन्न करण्यात तिचा मोठा वाटा होता. या नदीचे पाणी अडविण्यासाठी आणि रेल्वेला पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिशांनी बहनोली आणि काकाळे या गावांच्या मध्यभागी धरण उभारले. ग्रेट इंडियन पेनेन्सुला कंपनीने कल्याण स्थानकाला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधले. नव्वदच्या दशकापर्यंत कल्याणच्या रेल्वे वसाहतीला या धरणातून पाणीपुरवठा होत होता. तो जरी होत असला, तरी सर्व पाणी न अडवता नदी वाहती रहावी, यासाठी या नदीतून नियमित पाणी सोडले जात असे. त्यामुळे या धरणामुळे ही नदी बारमाही वाहती बनली होती. अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत शुद्ध पाण्याचे बारमाही स्त्रोत असणारी वालधुनी पुढील काळात वाढत्या नागरिकीरणाची बळी ठरली.
अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण येथील औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी थेट प्रवाहात सोडले जाऊ लागले. त्यावर कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियंत्रण नव्हते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेहमीप्रमाणेच सपशेल दुर्लक्ष केले. लक्षात आणून देऊनही त्यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी बेफिकीरी दाखवली. पार शहाडपर्यंत सोडल्या गेलेल्या रासायनिक पाण्यामुळे नदीतील नैसर्गिक जीवनचक्र बिघडले. त्याचवेळी वाढत्या अतिक्र मणांमुळे वालधुनीचे पात्र आकसून गेले. या नदीकडील दुर्लक्षाचे दशावतार एवढ्यावरच थांबले नाहीत. केवळ स्थानिकच नव्हे तर दूरवरच्या अगदी वापी परिसरातील औद्योगिक कारखान्यांचे दूषित, रासायनिक सांडपाण्याचे टँकर वालधुनीच्या नाल्यात रातोरात रिकामे केले जात असत.
आसपासच्या परिसरातील कारखानेही रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दिवसभर साठवलेले सांडपाणी याच नदीत सोडून देत. त्यामुळेच वालधुनी नदीचे नाव ‘वालधुनी नाला’ असे झाले. जीआयपी धरणातून सोडलेले पाणी पुढे प्रदूषित होऊन कल्याण खाडीत गेले. त्यामुळे खाडीही प्रदूषित झाली.
आजवर नदीचा मूळ स्त्रोेत दूषित झाला नव्हता. मात्र आता तोही प्रदूषित झाल्याने धरणातील पाणीही खराब होऊ लागले आहे. नदीचा मूळ प्रवाह, तिचे पात्र, तिला जोडणारे नाले बुजविण्याचा सपाटा लावल्याने नदीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. वालधुनी नदीची लांबी ११ हजार ७०० मीटर असून, त्यापैकी तीन हजार ६०० मीटर लांबी ही कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात येते. उल्हासनगर हद्दीतून एक हजार २०० मीटर लांबीचा प्रवाह वाहतो. वालधुनी नदीवर एक रेल्वे पुल आणि रस्ते वाहतुकीसाठी दोन पुल बांधले आहेत, तर सहा हजार ९०० मीटरचे अंतर हे अंबरनाथ तालुक्यातील आहे. चिखलोली धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह अंबरनाथ शहराजवळ वालधुनी नदीला मिळतो. पुढे विठ्ठलवाडी स्थानकाजवळ कल्याण पूर्वेतून येणारा आणखी एक मोठा प्रवाह वालधुनी नदीमध्ये विलीन होतो. या दोन्ही प्रवाहांना वालधुनी नदी अशीच ओळख असून, मूळ नदीप्रमाणे या उपप्रवाहांचे पाणीही प्रदूषित आहे. या एवढ्या मोठ्या प्रवासात नदीतील शुद्ध पाणी सर्वसामान्य नागरिकांना पाहायलाही मिळत नाही. ते पाहण्यासाठी जीआयपी धरणच गाठावे लागते, मात्र आज ते पात्रही प्रदूषित होते आहे.