एका क्लिकने उत्साहाला उधाण...

By Admin | Updated: June 18, 2014 02:38 IST2014-06-18T02:38:50+5:302014-06-18T02:38:50+5:30

दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेला दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाइनद्वारे जाहीर झाला

Thrive with enthusiasm with one click ... | एका क्लिकने उत्साहाला उधाण...

एका क्लिकने उत्साहाला उधाण...

मुंबई : दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेला दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाइनद्वारे जाहीर झाला. परीक्षेचा निकाल पाहण्यास विद्यार्थ्यांनी घराजवळील सायबर कॅफे तर काहींनी घरातच वेबसाइटवर एका क्लिकवर निकाल पहिला. परीक्षेनंतर धास्ती लागलेल्या निकालात चांगले गुण मिळाल्याचे पाहताच विद्यार्थी आणि पालकांनी आनंद साजरा केला. निकाल पाहता न आल्याने मुंबई मंडळातील दीड हजार विद्यार्थ्यांची पुरती निराशा झाली असून या विद्यार्थ्यांना आणखी दोन दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
निकाल जाहीर होण्यास काही दिवसांचा विलंब झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यातच निकाल जाहीर होण्याबाबत अफवांचे पीक आल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक अधिकच वाढली होती. मंगळवारी दुपारी निकाल जाहीर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसत होती. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी घराजवळील सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. तर काही विद्यार्थ्यांचे निकाल पालक, नातेवाइकांनी आपल्या कार्यालयातच पाहिले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुलांचे कौतुक झाले, तर कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला.
मुंबईतील अनेक शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल दुपारी उशिरापर्यंत उपलब्ध झाले नव्हते. यामुळे पालकांसह विद्यार्थीही टेन्शनमध्ये आले. अखेर विद्यार्थ्यांनी शाळेत धाव घेतली. मात्र, शाळांमध्येही निकाल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांवर निराश होण्याची वेळ आली. अखेर शाळांच्या मुख्याध्यापकांनी मंडळाकडे विचारणा केल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांची निकालाबाबतची धाकधूक कायमच राहिली आहे. अनेक शाळांकडून शिक्षण मंडळाला विद्यार्थ्यांची ग्रेडलिस्ट आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांची यादी उशिरा पाठविल्याने मंडळाने या विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित ठेवला आहे. येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल, असे मुंबई मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले.

Web Title: Thrive with enthusiasm with one click ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.