तीन वर्षांतच क्रीडासंकुलाला पडल्या भेगा
By Admin | Updated: February 9, 2017 03:53 IST2017-02-09T03:53:53+5:302017-02-09T03:53:53+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने फेब्रुवारी २०१४ मध्ये लोकार्पण केलेल्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला अवघ्या तीन वर्षातच भेगा पडू लागल्या आहेत

तीन वर्षांतच क्रीडासंकुलाला पडल्या भेगा
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने फेब्रुवारी २०१४ मध्ये लोकार्पण केलेल्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला अवघ्या तीन वर्षातच भेगा पडू लागल्या आहेत. या भेगा पालिका बुजवत असली तरीही बांधकाम दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संकुलासाठी भार्इंदर पूर्वेकडील नागरी सुविधा भूखंड निश्चित करण्यात आले. एकूण ११ हजार ७८७ चौरस मीटर जागेच्या १५ टक्के म्हणजेच १ हजार ७६८ चौरस मीटर जागेत स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधण्याचे ठरविले. परंतु, ते बांधण्यासाठी कोट्यवधींची आवश्यकता असल्याने माजी खासदार संजीव नाईक यांनी निधीतून ते बांधण्याचे निश्चित करण्यात आले. सुरुवातीला तीन टप्प्यातील या स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी सुमारे २१ कोटी ३५ लाखांच्या निधींची तरतूद करण्यात आली. या प्रस्तावाला २० एप्रिल २०११ च्या महासभेने मंजुरी दिली. शायना कंस्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट देण्यात आले. दरम्यानच्या काळात उद्भवलेल्या अडचणींवर मात करत अखेर २०१४ मध्ये ते तातडीने पूर्ण करण्यात आले. यात पालिकेतीलच काही अधिकाऱ्यांनी खो घालून बांधकामाला विलंब लावत बांधकामाच्या दर्जाकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रशासनाने अनेकदा निविदा काढल्या. परंतु, धोरणातील जाचक अटींमुळे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कॉम्प्लेक्ससाठी खर्च करण्यात आलेला निधी सत्कारणी लागत नव्हता.
महासभेने धोरण ठरविण्याचा अधिकार तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिला. आयुक्तांनी ठिकठिकाणच्या क्रीडा संस्थांचे दर तसेच त्यांच्या अटी-शर्तींचा लेखाजोखा मागवून धोरण तयार करण्याची प्रक्रीया सुरु केली. तीन वर्षांपासून तांत्रिक अडचणींसह धोरण निश्चित न झाल्याने त्याला भेगा पडू लागल्या आहेत. दरम्यान, शहर अभियंता शिवाजी बारकुंड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी होऊ शकलेला नाही. (प्रतिनिधी)