तीन वर्षे सांडपाणी खाडीतच
By Admin | Updated: June 29, 2017 02:53 IST2017-06-29T02:53:48+5:302017-06-29T02:53:48+5:30
डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज टूमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालविण्यास एमआयडीसीने नकार दिला आहे.

तीन वर्षे सांडपाणी खाडीतच
मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज टूमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालविण्यास एमआयडीसीने नकार दिला आहे. त्याचवेळी कापड प्रक्रिया कारखाने आणि रासायनिक कारखान्यातील सांडपाण्यावर स्वतंत्र प्रक्रिया करता यावी, यासाठी त्यांच्या वाहिन्यांच्या वर्गीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर स्वतंत्र वाहिनी टाकून हे पाणी खाडीत सोडले जाईल. त्याला तीन वर्षे लागणार असल्याने तोवर रसायनमिश्रित सांडपाणी तसेच खाडीत सोडले जाईल.
रासायनिक कारखान्यांच्या सांडापाणी प्रक्रियेचा विषय हरीत लवादापुढे आहे. त्यातून ८६ कारखाने बंद झाले होते. आता २५ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची मुभा मिळाली आहे. तो प्रस्ताव प्रदूषण मंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
एमआयडीसीच्या दोन्ही फेजमध्ये कापड प्रक्रिया आणि रासायनिक कारखान्यांतील सांडपाण्यावर एकत्र प्रक्रिया केली जाते. ती वेगळी करण्याचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. फेज वनमधील प्रक्रिया केंद्रात केवळ कापड उद्योगातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होईल आणि फेज टूमध्ये रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यांच्या वर्गीकरणाचे काम यंदा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. प्रक्रिया वेगळी झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा एमआयडीसीचा दावा आहे. त्याची निविदा जरी पंधरवड्यात निघणार आहे. त्यानंतर ठाकुर्लीतून खाडीपर्यंत सांडपाणी वाहून नेण्यासाठी वाहिनी टाकली जाईल. तिला तीन वर्षे लागतील.
सांडपाणी वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची वाहिनी टाकण्यात आली आहे. ठाकुर्ली रेल्वेब्रीज ते कल्याण खाडीपर्यंत साडेसात किलोमीटरची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी १०४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तो एमआयडीसी करणार आहे. त्याची निविदा पंधरवड्यात काढली जाईल, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही पाइपलाइन टाकण्याचे काम तीन वर्षात पूर्ण केले जाईल, असे एमआयडीसीने कळवल्याचे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.