‘त्या’ इमारतीचा ढिगारा उपसताना तिघे जखमी
By Admin | Updated: August 14, 2015 01:29 IST2015-08-14T01:29:06+5:302015-08-14T01:29:06+5:30
ठाकुर्लीतील मातृकृपा या पडलेल्या इमारतीचा ढिगारा उसपून दस्तऐवज काढण्याचे काम सुरू असतानाच अचानकपणे ढिगाऱ्याखालच्या एका सिलिंडरसदृश वस्तूचा

‘त्या’ इमारतीचा ढिगारा उपसताना तिघे जखमी
डोंबिवली : ठाकुर्लीतील मातृकृपा या पडलेल्या इमारतीचा ढिगारा उसपून दस्तऐवज काढण्याचे काम सुरू असतानाच अचानकपणे ढिगाऱ्याखालच्या एका सिलिंडरसदृश वस्तूचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास घडली. त्यामध्ये केडीएमसीचे अधीक्षक आणि तीन कर्मचारी जखमी झाले तसेच याच ठिकाणची एक महिला रहिवासीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली.
दोन दिवसांपासून या ठिकाणचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. त्यापैकी बुधवारी ते काम झाले होते. गुरुवारीही सकाळपासून ते सुरू होते. पोकलेन आणि गॅसकटर आदींसह अन्य साहित्याच्या आधारे हे काम सुरू होते. गॅसकटर सुरू होते. त्याच वेळी पोकलेनचा काही भाग गॅस सिलिंडरला लागला. गॅसकटरच्या सान्निध्यात ते आल्याने तत्काळ स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पालिका सूत्रांनी दिली. घटनास्थळी तातडीने जाऊन प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेमध्ये महापालिकेचे अधीक्षक शेट्टे हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला भाजले असून त्यांना सायन इस्पितळात उपचारार्थ पाठवले आहे. तसेच अन्य तिघा कर्मचाऱ्यांना येथील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले असून ते किरकोळ जखमी असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, एक महिलादेखील किरकोळ जखमी झाली असून त्यांना महापालिकेच्या पंचायतबावडी परिसरातील रुग्णालयात पाठवण्यात आले होते.