चार महिन्यांत तीन कोटींचा दंड वसूल
By Admin | Updated: September 5, 2015 02:58 IST2015-09-05T02:58:31+5:302015-09-05T02:58:31+5:30
राज्यात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करण्यास बंदी असताना तिच्याकडे कानाडोळा करून राजरोस बेलगामपणे बेफाम वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत

चार महिन्यांत तीन कोटींचा दंड वसूल
पंकज रोडेकर, ठाणे
राज्यात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करण्यास बंदी असताना तिच्याकडे कानाडोळा करून राजरोस बेलगामपणे बेफाम वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) कारवाई सुरू आहे. त्यानुसार ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई आणि आच्छाड या विभागांत मागील चार महिन्यांत तीन हजार ७३८ वाहनांवर कारवाई करून तीन कोटींचा तडजोडीअंती दंड वसूल केल्याची माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली.
चालू वर्षातील चार महिन्यांत एकूण २२ हजार ८५३ वाहने तपासली असून त्यामधील तीन हजार ७३८ वाहने दोषी आढळली आहेत, तर तीन हजार ७७४ प्रकरणे निकाली काढून त्यांच्याकडून तडजोड करून तीन कोटी १८ लाख २९ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
आच्छाड येथून ६७ लाख ६ हजार वसुली
दोन हजार ५८४ वाहने जप्त केली आहेत. यामध्ये आच्छाड येथे सर्वाधिक दोषी आणि जप्त केलेल्या वाहनचालक-मालकांकडून ६७ लाख ६ हजारांचा दंड वसूल केला आहे. त्यापाठोपाठ ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई तसेच वसई विभागात कारवाई केली आहे. विशेष म्हणजे आच्छाड येथे दोषी ठरवलेली सर्वच वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१ ते ३१ आॅगस्टदरम्यान ठाणे शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. या वेळी शहरातील विविध मुख्य नाक्यांवर प्रादेशिक परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांची सहा पथके तैनात होती. त्यांनी २६४ वाहने दोषी ठरवून ८० वाहने जप्त केली आहेत. तर, ३४ लाख २७ हजार ५०० रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे.
असा आकारला जातो दंड
मोटार वाहतूक कायद्यात दंड शुल्क आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार, कारवाई केली जाते. पहिल्या टनाला अडीच हजार रुपये असून त्यापुढील टनाला प्रति हजार रुपये वाढ होते.
किती मालवाहतूक करता येते
मालवाहतूक करणाऱ्या ६ चाकी वाहनांना ९ ते १० टन तसेच १० चाकी वाहनांना जवळपास १५ ते १६ टन वाहतूक करण्याची परवानगी आहे.