तीन म्हशींचे दुधाचे सड कापले
By Admin | Updated: November 13, 2016 01:02 IST2016-11-13T01:02:17+5:302016-11-13T01:02:17+5:30
मांगरूळ गावातील पाटील कुटुंबीयांच्या मालकीच्या ७ म्हशींपैकी तीन म्हशींचे दुधारे सर (दुधाचा भाग) कापल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस

तीन म्हशींचे दुधाचे सड कापले
अंबरनाथ : मांगरूळ गावातील पाटील कुटुंबीयांच्या मालकीच्या ७ म्हशींपैकी तीन म्हशींचे दुधारे सर (दुधाचा भाग) कापल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. या तीनही म्हशी बचावल्या तरी मुक्या प्राण्यांवर झालेल्या या संतापजनक प्रकारामुळे ग्रामस्थ प्रचंड चिडलेले आहेत. हा प्रकार कोणी केला, याबाबत काही कल्पना नसली तरी एखाद्या माथेफिरूने हा प्रकार केल्याचा संशय पाटील कुटुंबीयांना आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड रस्त्यावरील मांगरूळ गावात हा प्रकार घडला आहे. येथे राहणारे लक्ष्मण पाटील हे ३० वर्षांपासून म्हशीच्या दुधाचा व्यवसाय करीत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर चालत असल्याने कुटुंबातील सदस्यांप्रमाणे पाटील कुटुंबीय या म्हशींची देखरेख करतात. मात्र, गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी पहाटे अज्ञात माथेफिरूने गोठ्यात प्रवेश करून ७ पैकी ३ म्हशींचे दुधाचे सर कापले. यामुळे या म्हशी त्रासाने बेचैन झाल्या होत्या. सकाळी लक्ष्मण पाटील गोठ्यात आल्यावर त्यांना एका म्हशीची सर दुखावली गेल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी त्या म्हशीचे दूध न काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या म्हशीकडे वळल्यावरही तोच प्रकार दिसला. त्यानंतर, त्यांनी सर्व म्हशींची चाचपणी केल्यावर तीन म्हशींचे सर कापल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच पशुवैद्यकीय रुग्णालयातून डॉक्टरांना उपचारासाठी बोलवले. तसेच या प्रकरणाची तक्रार त्यांनी हिललाइन पोलीस ठाण्यात दिली. या अमानवी कृत्यामुळे तीनही म्हशींचे जीव धोक्यात आले होते. आता त्यांचा जीव वाचला असला तरी त्या यापुढे दूध देऊ शकणार नसल्याने पाटील कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुधाच्या व्यवसायाच्या रागातून की, वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडला, याचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)