ज्यांना अंथरल्या सत्तेच्या पायघड्या, त्यांचाच शिवसेनेला ठेंगा
By Admin | Updated: February 8, 2017 04:10 IST2017-02-08T04:10:03+5:302017-02-08T04:10:03+5:30
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधलेले शिवबंधन काही तासांत झुगारणाऱ्यांविरोधात पक्षाला उमेदवार मिळाले नाही. या प्रकाराने शिवसेनेची नाचक्की झाली

ज्यांना अंथरल्या सत्तेच्या पायघड्या, त्यांचाच शिवसेनेला ठेंगा
सदानंद नाईक, उल्हासनगर
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधलेले शिवबंधन काही तासांत झुगारणाऱ्यांविरोधात पक्षाला उमेदवार मिळाले नाही. या प्रकाराने शिवसेनेची नाचक्की झाली असून प्रभाग क्र.-२० मध्ये अधिकृत उमेदवाराविरोधात निष्ठावंताने पर्यायी पॅनल उभे करून पक्षाला दिलेले आव्हान सत्तेचे गणित बिघडवणारे ठरणार आहे.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपा-रिपाइं-साई पक्षांची सत्ता होती. त्या वेळी निष्ठावंतांना डावलून राजकीय गरज म्हणून अपक्ष नगरसेवक विजय पाटील, काँग्रेसच्या नगरसेविका मीना सोंडे, जया साधवानी यांना प्रभाग समिती सभापतीसह विविध समित्यांचे सभापतीपद दिले. महापालिका निवडणुकीदरम्यान मीना सोंडे व विजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश घेण्याचे शब्द वरिष्ठ नेत्यांकडे दिले होते. त्यानुसार, त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. तसेच दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले.
यानंतर, महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता, अशी सिंहगर्जना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यासमोर केली. तसेच प्रभाग क्र.-१९ मध्ये त्यांची उमेदवारी निश्चित केली. मात्र, काही तासांत मीना सोंडे, विजय पाटील, किशोर वनवारी यांनी समर्थकांसह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ओमी कलानी, कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत प्रवेश करून दुसऱ्या दिवशी भाजपाच्या वतीने उमेदवारी दाखल केली. अचानक झालेल्या राजकीय स्फोटामुळे शिवसेनेची झोप उडाली. त्यांना प्रभाग क्र.-१९ मधून उमेदवार मिळेनासे झाल्यावर भाजपाच्या विद्यमान नगरसेविका माया मसंद, बशीर शेख, युवासेनेचे शहराधिकारी धीरज ठाकूर, महापौर अपेक्षा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बशीर शेख व माया मसंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाही, तर महापौर अपेक्षा पाटील यांचा अर्ज बाद झाला. धीरज ठाकूर यांच्याऐवजी विनोद ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकमेव शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. या प्रकाराने चिडलेल्या ठाकरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुखासह खासदार, आमदार, शहरप्रमुख यांची कानउघाडणी केली. असाच प्रकार प्रभाग क्र.-२० मध्ये झाला. पक्षाचे विद्यमान नगरसेवक प्रधान पाटील, महापौर अपेक्षा पाटील, समिधा कोरडे, जयेंद्र मोरे यांना डावलून पक्षाने अंबरनाथ शहराचे उपशहरप्रमुख परशुराम पाटील यांच्या दोन मुलांना उमेदवारी दिली. प्रधान पाटील यांच्यासह जयेंद्र मोरे व समिधा कोरडे यांनी शिवसेनेविरोधात पर्यायी पॅनल उभे केले. विकासाचा हिशेब नागरिक मागत असल्याने पक्षाचा जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध केला नाही.