स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे राज्यात वाहण्यास सुरूवात झाली असून, पक्षांतरांनाही वेग आला आहे. अशात मनसेच्या काही स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर माजी आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला.
कल्याण डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला धक्का दिला. मनसेच्या दोन माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश केला. माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे यांच्यासह मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. यावर माजी आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला.
यांच्यामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला -राजू पाटील
राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय?"
"यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केलाय. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागलाय. ज्यावेळी स्वत:ला पोरगं होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मुल मांडीवर घ्याव लागतं. मिंधे गटाची हीच अवस्था आहे. आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झालेत. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही", असा संताप माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला.
सर्वाधिक महापालिका असलेल्या ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी लक्ष्य केंद्रीत केलं आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना कामाला लागली असून, दोन माजी नगरसेवक आणि इतरांना पक्षात घेऊन मनसेला झटका दिला आहे.
मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे यांच्यासह उप शहराध्यक्ष किशोर कोशिंबकर, सुरेश मराठे, रवींद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.