कळव्यासह ठाणे बाजारपेठेत चोरी : लाखोंचा ऐवज लुबाडला
By Admin | Updated: July 14, 2017 23:01 IST2017-07-14T23:01:36+5:302017-07-14T23:01:36+5:30
कळव्यासह ठाण्याच्या बाजारपेठेतील घरांमधून चोरट्यांनी सोनेचांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज गुरुवारी मध्यरात्री लंपास

कळव्यासह ठाणे बाजारपेठेत चोरी : लाखोंचा ऐवज लुबाडला
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १४ - कळव्यासह ठाण्याच्या बाजारपेठेतील घरांमधून चोरट्यांनी सोनेचांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज गुरुवारी मध्यरात्री लंपास केला. याप्रकरणी कळवा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
जांभळीनाका बाजारपेठेतील ठक्कर प्लाझा येथील रहिवासी श्रीराम वर्मा १२ जुलै रोजी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी त्यांच्या घराच्या कडीचा कोयंडा चोरट्यांनी तोडून घरात शिरकाव केला. त्यांनी त्यांच्या कपाटातील एक लाख २५ हजारांची रोकड तसेच एटीएमकार्डही नेले. चोरलेल्या एटीएमकार्डवरच परवलीचा क्रमांक (पासवर्ड) मिळाल्यामुळे त्यांनी एटीएममधूनही आणखी २५ हजारांची रोकड चोरली. अशा दीड लाखाच्या चोरीप्रकरणी वर्मा यांनी १३ जुलै रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कळव्याच्या आतकोनेश्वरनगरातील द्रोणागिरी चाळीतील सुनील धुमाळ यांच्या घरातूनही चोरट्यांनी १२ जुलै रोजी रात्री १० ते १३ जुलै पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दरवाजाचे टाळे तोडून घरात शिरकाव केला. या घटनेत ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, १५ हजारांची सोन्याची माळ आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे असा ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज कपाटातून लंपास केला. याप्रकरणी, धुमाळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून उपनिरीक्षक के.डी. सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.