ठाणे : वंदना सिनेमा एसटी स्थानकाजवळ राज्य परिवहन सेवेच्या कार्यालयासमोरून पायी जाणाऱ्या एका ४१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघांनी पलायन केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचपाखाडी येथे राहणारी ही महिला वंदना सिनेमा एसटी बसस्थानकाजवळ अल्मेडा सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयासमोरून २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जात होती. त्यावेळी तिच्या पाठीमागून चालत आलेल्या एका भामट्याने धक्का देऊन तिचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून पलायन केले. त्यानंतर मोटारसायकलीवरून आलेल्या एका साथीदाराबरोबर तो पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.