लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिवाळीच्या सुटीनिमित्त ज्वेलर्सच्या दुकानाचा मालक गावी गेल्याची संधी साधून त्याच्याकडील सुमारे पावणेतीन लाखांचे सोनेचांदीचे दागिने चोरणा-या दिनेश सिंग याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील सर्वच्या सर्व दोन लाख ६३ हजार ५०० चा ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वर्तकनगर येथील नितेश डांगी (३९) यांचे वागळे इस्टेट, लुईसवाडी भागात राजदर्शन इमारतीमध्ये हे दुकान आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त ते कुटुंबासह १० नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ७ ते १२ नोव्हेंबर २०१८ च्या सकाळी ११.३० वा.च्या सुमारास ते खंडाळा येथे गेले होते. ते गावाहून परतल्यानंतर त्यांच्या दुकानातील बरेच दागिने चोरीस गेल्याचे त्यांना आढळले. त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. इतरवेळी दुकानाच्या चाव्या कोणाकडे असतात, याबाबतची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी केली. त्याच अनुषंगाने त्यांचा नोकर दिनेश सिंग याला पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणा-या दिनेशने नंतर या चोरीची कबुली दिली. त्याने मुलुंड येथील एका ज्वेलर्सकडे चोरीतील दागिने विकले होते. यातील ७२ हजारांचे कानांतील जोड, ५४ हजारांच्या तीन अंगठ्या असा दोन लाख ६३ हजारांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. आरोपीला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या नोकराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:05 IST
मालक दिवाळीनिमित्त गावी गेल्याची संधी साधत नोकरानेच ठाण्यातील सराफाच्या दुकानामधील पावणे तीन लाखांचे दागिने चोरल्याचे उघड झाले. याप्रकरणी दिनेश सिंग या नोकराला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली.
ठाण्यातील सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या नोकराला अटक
ठळक मुद्देदोन लाखांचा माल हस्तगतवागळे इस्टेट पोलिसांची कामगिरीमालक गावी गेल्याची साधली संधी