‘ते’ आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: April 21, 2017 03:23 IST2017-04-21T03:23:09+5:302017-04-21T03:23:09+5:30
तीन महिन्यांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाजवळ जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले

‘ते’ आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
ठाणे : तीन महिन्यांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाजवळ जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. त्यापैकी पाच आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती.
२४ जानेवारी रोजी दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर ३५२ किलोग्रॅमचा गंजलेला रूळ टाकून मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात २५ जानेवारी रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दानिश अकबर शेख (वय २६), सुरज दिनेश भोसले (वय २५), मोहम्मद शब्बीर मोहम्मद नसीम शेख (वय ३४), नजीर उस्मान सय्यद (वय २४) आणि जयेश नागेश पारे (वय ३०) या मुंब्य्राच्या आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने गतआठवड्यात अटक केली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी मौला मकानदार हा दुसऱ्या एका गुन्ह्यात तळोजा कारागृहामध्ये होता. त्याच्याच सांगण्यावरून आरोपींनी घातपाताचा प्रयत्न केला होता. मुंब्य्राचे पाचही आरोपी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस कोठडीत बुधवारपर्यंत होते. ती संपल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची विनंती न्यायालयास केली. त्यानुसार, आरोपींना २४ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मौला मकानदार यालाही लोहमार्ग पोलिसांनी तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले. तो २४ एप्रिलपर्यंत त्यांच्या कोठडीत राहील, असे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)