माझ्या विकासकामांची यादी घेऊन भीक मागायचे काम चालू : मंत्री सरनाईक
By धीरज परब | Updated: December 18, 2025 15:43 IST2025-12-18T15:42:07+5:302025-12-18T15:43:29+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकमतशी बोलताना युतीसाठी ९५ जागां पैकी भाजपाला ६५ तर शिंदेसेनेला १७ जागा देण्याची आणि उर्वरित १३ जागा वाटून घेण्याची तयारी दर्शवली होती.

माझ्या विकासकामांची यादी घेऊन भीक मागायचे काम चालू : मंत्री सरनाईक
मीरारोड- आपण केलेल्या आणि माझ्या मतदारसंघात असलेल्या विकासकामांची यादी स्वतःच्या पत्रकात छापून लोकां कडे मतांची भीक मागण्याचे काम चालू असल्याची जाहीर टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांचा उल्लेख न करता केली आहे. तर जागावाटप हे सन्मानजनक आणि बरोबरीत हवे असे देखील त्यांनी म्हटले आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकमतशी बोलताना युतीसाठी ९५ जागां पैकी भाजपाला ६५ तर शिंदेसेनेला १७ जागा देण्याची आणि उर्वरित १३ जागा वाटून घेण्याची तयारी दर्शवली होती. इतकेच नव्हे तर वरिष्ठानी युतीचे अधिकार मला दिल्याने सरनाईक यांना माझ्या कडे यावे लागेल अशी टिप्पणी केली होती. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वरिष्ठांशी युती बाबत बोलू अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यातच आ. मेहतां कडून शहरात वाटल्या जात असलेल्या पत्रकात मंत्री सरनाईक यांच्या विधानसभा मतदार संघातील तसेच त्यांनी पुढाकार घेतलेली विकास कामे आपण केल्याचे नमूद केल्याच्या कारणाने मंत्री सरनाईक संतापले असल्याचे सांगितले जाते. मंत्री सरनाईक यांनी एका कार्यक्रमात त्यांनी जाहीर भाषणात, आपण केलेल्या विकासकामांची यादी घेऊन भीक मागायचे काम चालू केले आहे. इतक्या वर्षात गटार बनवले नाही तर वॉटर लांबची गोष्ट. उलट लोकांची नळ कनेक्शन बंद करण्याचे काम त्यांनी केले अशी टीका आ. मेहतांचे नाव न घेता केली. शहरात आम्ही बरोबरचे हिस्सेदार असून युती होईल तर ती बरोबरीची आणि सन्मानपूर्वक होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तर आ. मेहतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, भीक सारखी भाषा राजकारणात शोभत नाही. त्यामुळे आम्ही दुखावले गेलो आहोत. आमच्या कडे सर्व ९५ जागांवर उमेदवारी अर्ज आले असून आम्ही त्यादिशेने कामाला सुरवात केली आहे.