परीवहन सभापतींचा वॉर्ड असूनही बस नाही
By Admin | Updated: September 24, 2015 00:02 IST2015-09-24T00:02:19+5:302015-09-24T00:02:19+5:30
केडीएमसीचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रचंड दाटीवाटीची वस्ती, अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, आपत्कालीन स्थितीत भयंकर अडचणी,

परीवहन सभापतींचा वॉर्ड असूनही बस नाही
अनिकेत घमंडी, डोंबिवली
केडीएमसीचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रचंड दाटीवाटीची वस्ती, अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, आपत्कालीन स्थितीत भयंकर अडचणी, पुरेशा वाहतूक साधनांचा अभाव, मुलभूत सुविधांची वानवा, आरोग्याचा गंभीर प्रश्न अशा विविध प्रश्नांमुळे नागरिक हैराण आहेत. यापैकी बहुतांशी सुविधांचा अभाव येथील तुकारामनगर वॉर्डात दिसून येतो.
पाणी, वीज, पायवाटा, गटारी आणि अंतर्गत रस्ते हे जरी नगरसेवकाने दिले असले तरीही ‘स्वास्थ’ अर्थात नागरिकांच्या आरोग्य याचा विचार मात्र झालेला दिसून येत नाही. करमणुकीसाठी एकही साधन नाही, की त्याचे भविष्यात नियोजन नाही.
१० हजारांहून अधिकच्या वस्तीसाठी केवळ एकमेव वाचनालय आहे. मध्यमवर्गीय, तळागळातले नागरिक येथे वास्तव्यास आहेत, त्यांच्या पाल्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेचा प्रस्ताव आहे. परंतु, केवळ चांगली जागा मिळत नसल्याने तो कागदावरच आहे. केडीएमटीच्या सभापतींचा वॉर्ड अशी त्याची ख्याती आहे. परंतु, असे असतांनाही सभापती त्यांच्या या वॉर्डात बस आणू शकले नाहीत. आगामी काळात ते ती सुविधा देणार आहेत. परंतु, कधी याबाबत मात्र निश्चिती नाही. तसेच बस सुरु झाल्यावर ती कायमस्वरुपी राहणार याबाबतही शाश्वती नाही.
या वॉर्डाच्या विकासासाठी आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे, काँग्रेसचे आमदार संजय दत्त आदींनी भरपूर निधी दिला. परंतु, तो सर्व पायवाटा, गटारे यांच्यासाठीच वापरला गेला. त्या विशेष निधीतून वेगळे असे वॉर्डासाठी काही करण्यात नगरसेवक कमी पडल्याचे स्पष्ट होते. कचराकुंडी मुक्त वॉर्ड असला तरीही परिसरात खासगी मालमत्तांमुळे विकास करता येत नाही, त्यामुळे बहुतांशी ठिकाणी मातीचे ढिगारे दिसून येतात. त्यामुळेही परिसराला बकाल अवस्था आली आहे. कुठेही सरळ रस्ते नाही, आडवळणाच्या पायवाटांना रस्त्याचे स्वरुप दिले असून एकावेळी अवघी एकच रिक्षा जाऊ शकते, दोन मोठी वाहने एकमेकांसमोर आल्यास पंचाईत होते. अंतर्गत, चिंचोळा वॉर्ड वाढलेला असतांनाही फेरीवाला समस्या असून फुटपाथ नावालाच आहेत. विरंगुळयाचे साधन नाही. एका शाळेसमोरील चौकाचे कधीकाळी थातुरमातूर सुशोभिकरण केले होते. हे सांगावे लागावे इतकी त्या चौकाची दुरवस्था झाली असून त्याला डागडुजीची गरज आहे. तेथे असलेले कारंजे तांत्रिक कारणाने बंद पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ५ वर्षांत केले काय? असा जनतेचा प्रश्न आहे.