मतदारांच्या प्रभाग प्रारूप यादीचा पत्ताच नाही
By Admin | Updated: June 28, 2017 03:16 IST2017-06-28T03:16:57+5:302017-06-28T03:16:57+5:30
मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे

मतदारांच्या प्रभाग प्रारूप यादीचा पत्ताच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश असताना अद्याप महापालिकेने मतदारांची प्रारुप यादीच प्रसिध्द केली नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेने प्रारुप यादीच प्रसिध्द न केल्याने त्यावर हरकती, सूचना घेण्याची मुदत कमी होणार आहे.
मीरा- भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १३ जून रोजी प्रसिध्द झालेल्या विधानसभा मतदारयादीचा वापर महापालिका निवडणुकीसाठी करण्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. आयोगाने दोन जून रोजी आदेश काढून ५ जानेवारी ते १३ जून दरम्यान मतदारनोंदणी अधिकारी यांनी दाखल केलेली नवीन नावे व दुरुस्त्या महापालिकेने प्राप्त करून मतदारांचे प्रभागानुसार विभाजन करण्यास आयोगाने सांगितले हते.
मीरा- भार्इंदर महापालिकेला प्रभाग निहाय प्रारूप यादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्यास सांगितले होते. तर ७ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यावर २५ जून ते १ जुलैपर्यंत हरकती व सूचना द्यायच्या आहेत. हरकती वा सूचनांमध्ये केवळ लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा चुकून झालेला समावेश तसेच विधानसभा मतदारयादीत नाव असताना प्रभागाच्या यादीत वगळले असल्यास त्याचा समावेश करुन घेणे या दुरुस्त्या करता येणार आहेत.
मुदत उलटून दोन दिवस उलटले तरी मीरा- भार्इंदर महापालिकेने अद्यापही प्रारूप यादीच जाहीर केलेली नाही. वास्तविक महापालिकेने आयोगाच्या आदेशानुसार २५ जून रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय व अन्य कार्यालयांमधील सूचनाफलकांवर तसेच पालिकेचे संकेतस्थळ, वृत्तपत्र व केबलवाहिनीवर प्रसिध्द करणे आवश्यक होते. पण २६ जून होऊनही अजून महापालिकेने प्रारूप यादीच प्रसिध्द केलेली नाही. पालिकेच्या या सावळ्यागोंधळामुळे निवडणूक आयोगाचे आदेश केराच्या टोपलीत गेले आहेत. शिवाय मतदारयादीबाबत हरकती, सूचना घेण्याची मुदत १ जुलै पर्यंत असली तरी यादीच प्रसिध्द न झाल्याने प्रारूपयादीत नव्याने दाखल नावे, दुरूस्त्या यांची काटेकोर छाननी करण्यास इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांना कमी दिवस मिळणार आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सुमारे ५० हजार नवीन नावे मतदारयादीत नोंदवण्यात आली आहेत.