साडेसात लाखांची चोरी करणारे अटकेत
By Admin | Updated: December 30, 2016 01:17 IST2016-12-30T01:17:38+5:302016-12-30T01:17:38+5:30
कोपरीतील एका सराफाच्या दुकानातून सात लाख ५३ हजारांच्या सोने-चांदीच्या ऐवजाची चोरी करून, राजस्थानमध्ये पसार झालेल्या पाच चोरट्यांच्या कोपरी पोलिसांनी मुसक्या

साडेसात लाखांची चोरी करणारे अटकेत
ठाणे : कोपरीतील एका सराफाच्या दुकानातून सात लाख ५३ हजारांच्या सोने-चांदीच्या ऐवजाची चोरी करून, राजस्थानमध्ये पसार झालेल्या पाच चोरट्यांच्या कोपरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांचा ऐवजही हस्तगत केला आहे.
कोपरीतील धरमचंद जैन यांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान १२ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान फोडून, त्यांनी सात लाख ५३ हजारांच्या ऐवजाची चोरी केली होती. या प्रकरणी १३ नोव्हेंबर रोजी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यातील चोरटे राजस्थानातील उदयपूर भागात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. कोर्डे यांना मिळाली होती. तिच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांच्या पथकाने कमलेश आणि भवानीशंकर यांना उदयपूरच्या गावगुडा भागातून अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी या चोरीची कबुली दिली. त्यानंतर, हळदीघाट या अत्यंत दुर्गम भागातील कमलेश याच्या घरातून ७९ हजार ६९२ रुपयांची दोन हजार ६५६ ग्रॅम वजनाची चांदी आणि ५५.०६ ग्रॅम वजनाचे ५५ हजार ६० रुपयांचे सोन्याचे दागिने, तर भवानीशंकर याच्याकडून ५८ हजार ७७९ रुपयांचे दागिने हस्तगत केले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीनंतर त्यांचे साथीदार भवानीसिंग आणि भैरूसिंग यांनाही राजसंबंध येथून अटक केली. त्यांच्याकडूनही ९० हजार ८६५ रुपयांचे सोनेचांदीचे दागिने हस्तगत केले. त्यांच्या पाचव्या साथीदारालाही २९ डिसेंबर रोजी अटक केल्याची माहिती कोर्डे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणात सहा किलो ९११.२ ग्रॅम वजनाची चांदी आणि आठ तोळे सोन्याचे दागिने, असा सुमारे तीन लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. यातील आणखी दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)