भिवंडीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST2021-07-11T04:26:57+5:302021-07-11T04:26:57+5:30

भिवंडी : तालुक्यातील पूर्णा गावातील भगत ज्वेलर्स या दुकानात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, चोरी ...

Theft at a jeweller's shop in Bhiwandi | भिवंडीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी

भिवंडीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी

भिवंडी : तालुक्यातील पूर्णा गावातील भगत ज्वेलर्स या दुकानात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, चोरी करणारे दोन चोरटे ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सुमारे दाेन लाखांचे दागिने चाेरीला गेले आहेत.

ठाणे-भिवंडी रस्त्यावरील पूर्णा या गावातील बाजारपेठेत सुनील भगत यांच्या मालकीचे सोन्या-चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील शोकेसमध्ये लावलेले अडीच किलो वजनाचे चांदी व ११ ग्रॅम सोन्याचे दागिने व सहा हजार रोख रक्कम घेऊन पोबारा केला. हे चाेरटे दुकानात शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. एकाने रेनकोट तर एकाने छत्रीच्या साहाय्याने स्वत:ला लपवले आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ठसेतज्ज्ञ यांना पाचारण केले. यामध्ये सुमारे एक लाख ९५ हजार रुपयांच्या दागिने चोरी झाले आहे. याप्रकरणी वनिता भगत यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करत आहेत.

Web Title: Theft at a jeweller's shop in Bhiwandi