संदीप प्रधानसहयोगी संपादक
ठाणेपोलिस दलातील काही खाबू पोलिस वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने आरोपींना दारू पार्ष्या करायला प्रोत्साहन देत आहेत. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला नाकाखालून पळून जाण्यास मदत करत आहेत. एकाच दिवसात ठाणे पोलिस आयुक्तालयातील १५ पोलिसांना निलंबित करावे लागणे हे मान खाली घालायला लावणारे आहे.
गंभीर गुन्ह्यांकरिता आपण कायदे कठोर केले आहेत. परंतु, त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात भ्रष्ट व्यवस्था कमी पडत आहे. कुठलाही गंभीर गुन्हा घडतो तेव्हा आरोपीला जेरबंद केले जाते. परंतु त्या आरोपींकडे मजबूत पैसा असेल तर ते जेलमध्ये सर्व गोष्टी मॅनेज करू शकतात. कुठलाही गुन्हा उघड होतो तेव्हा मीडियापासून विरोधकांपर्यंत साऱ्यांचे त्यावर लक्ष असते. महिना-१५ दिवसांत नवनवीन गुन्हे घडल्यावर अगोदरच्या गुन्ह्यांकडील लक्ष विचलित होते. येथेच खाबू व्यवस्था गुन्हेगारांचे चोचले पुरवू लागते. आरोपींनी प्रकृतीच्या कुरबुरी केल्यावर त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता शासकीय इस्पितळात नेले जाते. फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी करण ढबालिया आणि राजेशभाई पांबर यांनाही कळव्याच्या रुग्णालयात तपासणीकरिता म्हणून जेलमधून बाहेर काढले. प्रत्यक्षात एका पोलिस कर्मचाऱ्याने या दोघांकरिता एका हॉटेलमध्ये दारू पार्टी ठेवली होती. याची कुणकुण लागल्याने ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अचानक एका अधिकाऱ्याला पाठवून तपासणी केली असता सातपैकी केवळ पाच आरोपी कळवा इस्पितळात आढळले.
परिणामी नऊ पोलिस निलंबित झाले. लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करायची व त्यातील पैसे जेल प्रशासन व पोलिस दलातील भ्रष्ट मंडळींना वाटून तुरुंगात ऐशआरामात राहायचे, अशी ही कार्यशैली आहे. ही पार्टी करण्याकरिता पोलिसांनी या दोघांकडून दीड-दोन लाख रुपये सहज उकळले असतील. कदाचित महिन्यात चार-पाचवेळा वेगवेगळ्या कैद्यांना अशा पार्ष्या किंवा मौजमजेकरिता मदत करून पाच-दहा लाखांचे तोडपाणी करणारे हे पोलिस दलातील काहींचे रॅकेट असू शकते. काही काळ निलंबित राहिल्यावर राजकीय नेत्यांकडून दबाव आणून पुन्हा सेवेत यायचे व हेच धंदे करायचे, हा काही पोलिसांचा खाक्या असू शकतो.
तिकडे भिवंडी न्यायालयात नेलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने सहा पोलिस निलंबित झाले. आता हा आरोपी खरोखरच पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला, की येथेही आरोपीने पोलिसांचे हात ओले केले होते हे चौकशीतच उघड होईल. पोलिस कोठडी असो की न्यायालयीन कोठडी; गांजा, दारू, मोबाइलपासून सर्व गोष्टी आरोपींपर्यंत पोहोचतात. फक्त या प्रत्येक 'सेवे'करिता घसघशीत दाम मोजायला तयार राहा, अशी ही किडलेली व्यवस्था आहे. हीच भ्रष्ट व्यवस्था आरोपपत्रात कच्चे दुवे ठेवते. साक्षीदार फोडण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करते. त्यामुळे आरोपी सात-दहा वर्षानंतर वरच्या न्यायालयात सुटतात, उजळ माथ्याने बाहेर आल्यावर मिरवणुका काढतात, गुन्हे करतात. ज्यांच्याकडे जामिनाचे पैसे भरायलाही कवडी नाही ते वर्षानुवर्षे तुरुंगात सडतात.