मीरारोड - ह्या वर्षी मेट्रोची ५० किमी मार्गिका, पुढील वर्षी ६२ किमी तर त्याच्या पुढच्या वर्षात ६० किमी मेट्रो मार्गिका तयार होऊन एकमेकांना जोडले जाणार असल्याने २०२८ पासून मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर प्रवाश्यांना करता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मीरारोडच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो टप्पा १ च्या तांत्रिक चाचणी साठी फडणवीस सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे आले होते.
काशिगाव मेट्रो स्थानकात मेट्रोच्या तांत्रिक चाचणीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सह अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मेट्रोत बसून त्या सर्वानी दहिसर मेट्रो स्थानक पर्यंत प्रवास केला.
काशिगाव, मीरागाव, पांडुरंगवाडी आणि दहिसर अशी मेट्रो मार्गिका पहिल्या टप्प्यात सुरु होणार आहे. आजची तांत्रिक चाचणी असून आणखी चाचण्या केल्या जातील. तसेच प्रलंबित कामे पूर्ण करायची असल्याने प्रत्यक्षात काशिगाव ते दहिसर मेट्रो सुरु होण्यास सुमारे ६ महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काशिगाव येथे मुख्यमंत्री म्हणाले कि, काशिगाव ते दहिसर पर्यंतच्या मेट्रोची तांत्रिक चाचणी केली गेली. लवकरच मेट्रोचे विधिवत उदघाटन करू. भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते अंधेरी पर्यंत मेट्रो जोडली जाईल. ती पुढे वांद्रे पर्यंत करायची आहे.
डोंगरी येथे मेट्रो डेपो बनेल कि विरार पर्यंत मेट्रो मार्गिका करणार. ह्या मेट्रो मार्गिका ठाण्याशी जोडून लूप तयार होईल जेणे करून मुंबई व एमएमआर च्या प्रवाश्याना प्रवास सुकर होईल. मुंबईचे ६० टक्के ट्रॅफिक हे पश्चिम महामार्ग वर असल्याने कोस्टल रोड आणि मेट्रो ने वाहतूक विभागण्याचा प्रयत्न आहे. वाढवणं बंदर आणि तिकडून बुलेट ट्रेन जाणार असल्याने मेट्रो त्याला जोडण्याचा विचार देखील आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
सदर मेट्रो हि ठाणे - मुंबईला जोडली जाईल तसेच भविष्यात पालघर जिल्हा जोडला जाईल. ज्याचा फायदा सदर भागातील नागरिकांना होईल. काशिगाव मेट्रोचा पहिला टप्पा डिसेम्बर २०२५ पर्यंत तर भाईंदर पर्यंतचा टप्पा २ हा डिसेम्बर २०२६ पर्यंत पूर्ण होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आता आम्ही तिघे एकत्र आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने विकासाची एक्स्प्रेस सुरु केलेली आहे. आता त्याच्या मध्ये कोणी स्पीडब्रेकर आणू शकत नाही, बूस्टर देऊ शकतात. स्पीडब्रेकरला जागा नाही असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.